ठाणे- अंबरनाथमध्ये दोन भामटयांनी एका वयोवृध्द व्यक्तीला पोलीस असल्याची बतावणी केली. तसेच त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने लंपास करून कागदामध्ये एक रुद्राक्ष देऊन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. विनायक साळवी (५९) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
ठाण्यात तोतया पोलिसांनी केले वयोवृद्धाचे सोन्याचे दागिने लंपास - ठाण्यात चोरी
पोलीस असल्याची बतावणी करत दोन भामटयांनी विनायक साळवी यांच्या जवळील सोन्याची चैन व अंगठी असे साडे सात हजार रूपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले.
अंबरनाथ पश्चिम येथील वरचापाडा परिसरात विनायक साळवी हे वयोवृध्द राहतात. ते सकाळच्या सुमारास फॉरेस्ट नाका येथील महानगर गॅस सीएनजी पेट्रोलपंप केबीरोड येथे रिक्षाची वाट पाहत उभे होते. त्यावेळी दोन भामटयांनी विनायक यांना वाटेत थांबवले. त्यापैकी एकाने आम्ही पोलीस आहोत तुम्ही इथे काय करत आहात, तुम्हाला माहित नाही का, इथे सीएनजी पेट्रोल पंपावर गेल्या महिन्यात स्फोट झाला आहे. तुमच्या गळयातील सोन्याची चैन व हातातील सोन्याची अंगठी तुम्हाला घालून फिरता येणार नाही. तुम्ही ती साखळी व अंगठी बॅगेत काढून ठेवा. असे सांगून त्यांच्याकडील कागदामध्ये विनायक यांच्या जवळील सोन्याची चैन व अंगठी असे साडे सात हजार रूपयाचे सोन्याचे दागिने कागदामध्ये ठेवण्याचा बहाणा करत ते दागिने लंपास केले. आणि त्या बदल्यात एका कागदामध्ये एक रुद्राक्ष देऊन ती पुडी विनायक यांच्याकडे देऊन ते पसार झाले.
आपली फसवणूक झाल्याचे विनायकी यांना कळताच त्यांनी अंबरनाथ पोलीस ठाणे गाठून त्या दोन भामटयांविरूध्द तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक खाडे करत आहेत.