ठाणे: जाणून घ्या ठाणे जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी संक्षित स्वरुपात.
1) लंपी आजाराने घेतला ४१ जनावरांचा बळी; साथ आटोक्यात आल्याचा पशूसंवर्धन विभागाचा दावा
ठाणे: लंपी आजारामुळे गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील ४१ जनावरांचा बळी गेल्याचे समोर आले आहे. सध्याच्या घडीला २९० जनावरांवर उपचार सुरु असून यातील १७ जनावरांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे देण्यात आली आहे. मात्र सद्यस्थितीत जिल्ह्यात लंपीच्या आजाराची साथ आटोक्यात असल्याची माहितीही जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे.
३८ गावांमध्ये लंपी आजाराचं प्रादुर्भाव:सप्टेंबर महिन्यात राज्यात जनावरांमध्ये लंपी आजाराची साथ पसरली होती. ठाणे जिल्ह्यातही भिवंडी, शहापूर, मुरबाड या तालुक्यातील जनावरांना देखील लंपीची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे अनेक उपायोजना राबविण्यात आल्या होत्या. यामध्ये बाधित झालेल्या जनावरांच्या पाच किलोमीटर परिघातील सर्व जनावरांचे लसीकरण करण्यात आले होते. तसेच लागण झालेल्या जनावरांचे लसीकरण, उपचार खर्च देखिल शासकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३८ गावांमध्ये या आजाराचं प्रादुर्भाव पसरला होता.
जिल्ह्यात ५५१ बाधित जनावरांची नोंद:बहुतांश गावांतील जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर उर्वरीत ठिकाणच्या जनावरांचे देखील लसीकरण करण्याचे काम जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६८ हजार ८७ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात ५५१ बाधित जनावरांची नोंद झाली आहे. यामध्ये भिवंडी, बदलापूर तसेच शहापूर मधील जनावरांचा समावेश आहे.
१७ बाधित जनावरांची प्रकृती गंभीर:सद्यस्थितीत जिल्ह्यातील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णलयांमध्ये तसेच पशुसंवर्धन विभागाच्या देखरेखीखाली २९० जनावरांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये १७ बाधित जनावरांची प्रकृती गंभीर आहे. तसेच पाळीव जनावरांबरोबरच गोशाळेतील जनावरांचे देखील लसीकरण करण्यात येत आहे.
2) बेकायदा निमकोटेड युरिया खताची साठवणूक करणाऱ्यांचा पर्दाफाश; १६ लाखांच्या युरियाच्या गोणी जप्त
ठाणे: गोदामामध्ये बेकायदेशीर निमकोटेड युरियाची साठवणूक करून शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांचा नारपोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत लमिल कंपाउंडमध्ये महालक्ष्मी वेअर हाउस आहे. हे वेअर हाऊस प्रफुल्ल चंद्रकांत देशमुख (२९ रा.नवी मुंबई) यांच्या ताब्यात असून येथे अवैधपणे निमकोटेड युरियाची साठवणूक करून शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याची गुप्त बातमी नारपोली पोलिसांना मिळाली होती. अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकून खतांच्या गोण्या भरण्यासाठी आलेल्या ट्रक क्र.केए ५६-५४७२ मधून १७८६ निमकोटेड व संशयित साठवणूक केलेल्या एकूण १६ लाख ९६ हजार ७०० रुपये किमतीच्या युरियाच्या गोण्या जप्त केल्या आहेत.