ठाणे- उल्हासनगर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज शहरातील विविध परिसरात अनधिकृत झोपडपट्टींवर धडक कारवाईचा बडगा उगारला. यावेळी पालिकेकडून शेकडो झोपड्यांवर हातोडा चालविण्यात आला. तर, उल्हासनगर रेल्वे स्थानकालगत असलेल्या अनधिकृत झोपड्या जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या. त्याचबरोबर, मांस विक्रेते, स्टॉल, टपऱ्यांवरही धडक कारवाई करीत त्यांनाही जमीनदोस्त केले गेले.
यावेळी झोपडीत राहणाऱ्या महिलांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस बंदोबस्त असल्याने कारवाई शांततेत पार पडली. संजय गांधी नगर भागात महापालिकेच्या राखीव भूखंडावर गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती. ही जागा खाली करण्याची सुचना महापालिकेने वारंवार इथल्या रहिवाशांना दिली होती. मात्र, तरी देखील इथले रहिवाशी आपली घरे खाली न करता या ठिकाणी राहत होते.