ठाणे :मुंबई नाशिक महामार्गावर खारीगाव टोल नाका ते अंजूर दिवे या परिसरात रस्त्यादुतर्फा पाणथळ जमिनीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात माती, मुरूम, दगड, डेब्रिज, वेस्टेजचा वापर करून भराव करण्यात येत आहे. हा भराव समृद्धी महामार्गाचे तसेच खारीगाव टोलनाक्यालगत खाडीकिनारा आहे. या भागात पाणथळ जमीन आहे. तसेच या खाडी किनार्याला कांदळवन लाभले आहे. परंतू दिवसेंदिवस या भागात अनधिकृतपणे माती भराव टाकून हाॅटेल, गॅरेज, ढाबे, पार्किंग प्लॉट करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. हाॅटेल, ढाबे व्यवसायाला सोन्याचे दिवस आल्यामुळे अशा पाणथळ जमीनीवर अतिक्रमण, भराव टाकून त्या भाड्याने देणाऱ्या दलालांच्या टोळ्याही या भागात सक्रीय झाल्या आहेत.
जैवविविधता होणार नष्ट :या पाणथळ जमीनीवर होत असलेल्या भरावामुळे जैवविविधता, पक्षी, मासे, किटक, फुलपाखरे दुर्मीळ होत आहेत. या भरावामुळे पावसाळ्यात कळवा, खारेगाव, पारसिक, मुंब्रा, अंजूर दिवे या भागासह भिंवडी कडील खाडी किनार्यालगतच्या गावांनाही पूराचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत जिल्हाधिकारी प्रशासनाला अनेक नागरिकांनी तक्रारी करून हा पर्यावरण घातक प्रकार निदर्शनास आणून दिला आहे, परंतु अद्याप ठोस कारवाई न झाल्याने यामध्ये प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे.
२०२१ पासून पर्यावरणाचा ऱ्हास :एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याआधीपासून या परिसरामध्ये अवैध भरणी करणे, अवैध आरएमसी प्लांट चालवणे, कांदळवन नष्ट करणे अशा अनेक नियमांचे उल्लंघन सुरू आहे. राजकीय वरदहस्त असल्यामुळे महसूल विभाग यावर कारवाई करत नाही, उलट नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारींना देखील केराची टोपली दाखवण्याचे काम महसूल विभागाकडून होत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी येणाऱ्या तक्रारींवर कारवाई करू, असे आश्वासन देत उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.