ठाणे - मध्यप्रदेशातून उल्हासनगरात 'मेड इन जपान'च्या पिस्तुलांसह जिवंत काडतुस विकण्यासाठी आलेल्या एका तस्कराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या तस्कराकडून दोन पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. मोहम्मद ईस्माईल शफी अब्बासी असे तस्कराचे नाव आहे.
मध्यप्रदेशातून 'मेड इन जपान'च्या पिस्तुलांची विक्री; उल्हासनगरमध्ये तस्कर गजाआड गुप्त बातमीदारामुळे पर्दाफाश
उल्हासनगर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल प्रफुल्ल सानप यांना गुप्त बातमीदारामार्फत कलानी काॅलेज समोर एक व्यक्ती पिस्तुल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी पथक तयार करून संबंधित कारवाई केली. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली. यावेळी त्याच्या जवळील प्लॅस्टीकच्या पिशवीत 2 पिस्तुल सापडले.
संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.