महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खाडी किनाऱ्यावरील अवैध हातभट्ट्यांवर छापा, ६ लाखांची दारू हस्तगत - डायघर

याप्रकरणी ७ जणांविरोधात मुंब्रा आणि डायघर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील फरार आरोपींचा पोलीस  शोध घेत आहेत.

खाडी किनाऱ्यावरील अवैध हातभट्ट्यांवर छापा

By

Published : Mar 13, 2019, 9:16 AM IST

ठाणे - खाडी किनारा लाभलेल्या मुंब्रा, डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झाडाझुडपात असलेल्या हातभट्टी दारूच्या भट्ट्यांवर गुन्हे शाखा, मुंब्रा पोलीस आणि डायघर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने संयुक्तरित्या कारवाई केली. या कारवाईत तब्बल ६ लाख १५ हजारांची हातभट्टीची दारू हस्तगत करण्यात आली.

याप्रकरणी ७ जणांविरोधात मुंब्रा आणि डायघर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

वारंवार हातभट्ट्यांवर मुंब्रा आणि डायघर पोलिसांमार्फत कारवाई करण्यात येत आहे. मात्र, ही संयुक्त कारवाई आतापर्यंतच्या कारवाईत सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मुंब्रा आणि डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देसाई गावाच्या बाजूला जंगलात खाडीच्या किनाऱ्यावर गावठी हातभट्टी दारू काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर खाडी किनारा असलेल्या मुंब्रा आणि डायघर पोलिसांच्या सोबत गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या छापेमारी केली. या छापेमारीत पोलिसांनी ६ लाख १५ हजार ६२० रुपयांची दारू हस्तगत केली.

दरम्यान, छापेमारीची चाहूल लागताच आरोपी अतुल केणे, दीपक केणे, किरण केणे, राहुल केणे, रुपेश केशव म्हात्रे, सचिन तुकाराम पाटील, प्रशांत बुधाजी रोकडे (सर्व रा. देसाई, मुंब्रा) यांनी पलायन केले. याठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्मित हातभट्टीची दारू हस्तगत करण्यात आली. मुंब्रा खाडी आणि देसाई गाव येथील कारवाईत शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून छाप्यात २ लाख ६५ हजार १२० किमतीची आणि मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ लाख ५० हजार ५०० रुपयांची दारू हस्तगत करण्यात आली.

दरम्यान पोलीस पथकाने हातभट्टीचे साहित्य, ड्रम , कच्चा माल आणि साहित्य मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस पथकाला पाहून पलायन केलेल्या आरोपीं विरोधात डायघर पोलीस भादवी ३२८, सह मुंबई दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) (फ) प्रमाणे व मुंब्रा पोलीस ठाण्यात भादवी कलम ३२८, मुंबई दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details