ठाणे - भिवंडी तालुक्यातील खाडी किनारी असलेल्या आलिमघर बेटावर मोठ्या प्रमाणात गावठी दारूच्या बेकायदा भट्ट्या होत्या. नारपोली पोलिसांनी ( Narpoli Police ) दारूच्या भट्ट्यांवर छापा टाकून सर्व हातभट्ट्या उध्वस्त करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आलिमघर बेटावरील गावठी दारूच्या हातभट्ट्या उध्वस्त चार दारू माफियांवर विरोधात गुन्हा..
चार दारू माफियांविरोधात विविध कलमानुसार नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अविनाश पाटील (रा. अलिमघर, ता. भिवंडी), दिलीप सोनू पाटील, योगेश नारायण पाटील ( दोघे रा. अळूर गाव ) आणि मनोहर सखाराम पाटील ( रा.अंजूर, ता. भिवंडी), असे गुन्हा दाखल झालेल्या दारू माफियांचे नाव आहे.
खबऱ्यामुळे दारू माफियांचा पर्दाफाश..
भिवंडी शहर हे कामगारांचे शहर म्हणून ओळखले जाते. तसेच ग्रामीण भागात असलेल्या गोदाम पट्ट्यातही लाखो कामगार काम करतात. मात्र, कामगार असलेल्या तळीरामांना विदेशी दारू परवडत नसल्याने त्यांचा कल स्वस्तात मिळणाऱ्या गावठी दारूकडे असतो. यामुळे ग्रामीण भागातील खाडी किनाऱ्यासह जंगलात मोठ्या प्रमाणात दारू माफियांनी हातभट्ट्या सुरू केल्या. त्यातच नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चेतन पाटील व पोलीस उपनिरीक्षक रोहन शेलार यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, आलिमघर बेटावर असलेल्या जगंलात मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टीची दारू उत्पादन करुन विक्री केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने खाडीतून बोटीने प्रवास करत बेटावर पोहोचत गावठी दारू हातभट्ट्याचे स्थळ गाठले.
3 लाख 86 हजारांचे साहित्य जप्त...
पोलीस पथकाने घटनास्थळी पंचानाम करत सुमारे 3 तास या ठिकाणच्या गावठी हातभट्टीसाठी लागणारे प्लास्टिकचे ड्रम त्यामध्ये असलेला सडा उध्वस्त केला. शिवाय एकूण 3 लाख 86 हजारांचे साहित्य जप्त करुन चार दारू माफियांविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा -Couple Commits Suicide : दुर्गाडी पुलावरून खाडीत उडी मारून प्रेमी युगुलाची आत्महत्या