ठाणे -उल्हासनगर शहरातील एका घरामधून ११ लाखांचा अवैद्य गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थाचा साठा अन्न व औषध प्रशासन दक्षता विभाग आणि विठ्ठलवाडी पोलीसांनी संयुक्त पथकाने जप्त केला आहे. मात्र, छापेमारीची कुणकुण लागल्याने गुटखा माफिया फरार झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात गुटखा माफियांविरोधात गुन्हा दाखल करण्याता आला आहे. तर ज्या घरातून गुटखा जप्त करण्यात आला त्या घरमालकाला पोलिसांनी अटक केली आहे. नवीन दुसेजा असे अटक केलेल्या घरमालकचे नाव आहे.
गुरूसंगत दरबारच्या मागून गुटखा जप्त -
उल्हासनगर येथील कॅम्प ४ सेक्शन २६ गुरूसंगत दरबारच्या मागील बाजूला असलेल्या एका घरात प्रतिबंधित गुटखा साठवून ठेवल्याची गुप्त माहिती अन्न औषध प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुरुवारी दुपारच्या सुमारास अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी आणि विठ्ठलवाडी पोलिसांनी संयुक्त छापा टाकला. यावेळी ११ लाखांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला आहे. पोलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी घर मालक नवीन दुसेजा याला अटक केली आहे. तर अज्ञात गुटखा माफिया याच्यावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु आहे.