ठाणे: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवरा व मृतक बायको दोघेही मूळचे बिहार राज्यातील आहेत. रोनीतराज आणि नीतू कुमारी यांचा विवाह २०११ साली झाला होता. त्यानंतर २०१६ साली आरोपी नवरा अंबरनाथमधील ऑर्डनन्स कंपनीत फिटर म्हणून नोकरीला लागला होता. हे जोडपे ऑर्डनन्स कंपनीच्या वसाहतीत राहत होते. लग्नाला 12 वर्षे झाली तरी देखील बायकोला मुलबाळ होत नसल्याने रोनीतराज तणावात होता. याच कारणावरून तो बायकोच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी वाद घालायचा. रविवारी (28 मे) रोजी दोघात वाद झाला होता. त्यावेळी दारूच्या नशेत असलेला आरोपी नवरा रोनीतराज मंडल याने बायको नीतू कुमारी हिला मारहाण करून खून केला.
खूनाचा रचला बनाव:बायकोचा घरात खून केल्यानंतर आरोपी नवऱ्याची घाबरगुंडी उडाली. यानंतर रविवारी सायंकाळच्या सुमारास त्याने शेजाऱ्यांना बोलावले आणि माझ्या बायकोला कोणीतरी ठार मारले असे सांगत खूनाचा बनाव रचला. दरम्यान घटनेची माहिती अंबरनाथ पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना करून तपासाला सुरुवात केली.