ठाणे - सासऱ्याकडे पैशांची मागणी केल्यावर ते न मिळाल्याच्या कारणावरून जावयाने रागाच्या भरात पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली. यानंतर पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही आरोपीने केला होता. मात्र, सदर कृत्य उघडकीस आणून आरोपी जावयाला बेड्या ठोकण्यात बदलापूर पोलिसांना यश आले आहे. कांचन सांबरे असे मृत महिलेचे नाव असून तुषार सांबरे (वय २८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बदलापूर पूर्व येथील शिवस्मृती अपार्टमेंटमध्ये तुषार सांबरे राहतो. त्याचे लग्न रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कांचन हिच्यासोबत झाले होते. तुषार पत्नी कांचनला घेऊन ३ नोव्हेंबरला त्याच्या सासरी गेला होता. त्यावेळी तुषारने सासरे काशिनाथ यांच्याकडे कामासाठी दीड लाख रूपये मागितले मात्र, काशिनाथ यांनी तुषारला पैसे दिले नाही. या गोष्टीचा तुषारला राग आला आणि तो पत्नी कांचनला घेऊन घरी परत आला. त्यांनतर त्याने राहत्या घरी कांचनची नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या केली.