ठाणेHusband Killed Servant:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 नोव्हेंबर रोजी भिवंडी अंजुरफाटा रेल्वे स्टेशन रोड येथील रेल्वे रुळानजीक निर्जन ठिकाणी एका झाडाला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह लटकलेला आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी पंचनामा करत सद्दामचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना करुन नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा स्थानिक पोलीस पथक आणि भिवंडी गुन्हे शाखेचं पथक समांतर तपास करत होतं. दरम्यान मृताची ओळख पटवण्यात त्यांना यश आलं.
बायकोचे अनैतिक संबंध असल्याचा संशय :मृत सद्दाम इसहाक हुसेन आरोपी मालकाकडं टेम्पो चालक म्हणून कामाला होता आणि तो मालकाच्या घरातच राहत होता. विशेष म्हणजे, आरोपीचे यापूर्वी दोन लग्न झाले होते. मात्र, आधीच्या दोन्ही बायका सोडून गेल्यानं त्यानं याच वर्षी तिसरं लग्न केलं होतं. त्यातच त्याची तिसरी बायको गरोदर राहिल्यानं नोकर आणि आपल्या बायकोमध्ये अनैतिक संबध असल्याचा संशय आरोपी नवऱ्याला आला होता.
नोकराला मारहाण आणि हत्या :तेव्हापासून संशयाचं भूत नवऱ्याच्या मानगुटीवर बसल्यानं त्यानं नोकर सद्दामचा काटा काढण्याचा प्लॅन रचला होता. ठरलेल्या प्रमाणं आरोपीनं मृतक चालकाला ८ नोव्हेंबर रोजी भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावाच्या हद्दीत बोलवून त्याला टेम्पोमध्ये बेदम मारहाण केली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी मालकानं त्याचा मृतदेह ताडाली गावाच्या हद्दीत असलेल्या रेल्वे रुळानजीकच्या एका झाडाला टांगला आणि तो फरार झाला.