ठाणे:मिळालेल्या माहितीनुसार मृतक शेहबाज हा टिटवाळा नजीक बल्याणी गावात राहत होता. तर त्याची दुसरी पत्नी मुमताज शहाड भागातील बंदरपाडा परिसरात राहत आहे. मुमताज हिचा आधी निकाह झाला असून पहिल्या पतीपासून तिला तीन मुले आहेत. तर मृतक शेहबाज हा तिचा दुसरा पती होता. शेहबाजपासून मुमताजला दोन मुले झाली आहेत. हीच दोन मुले घेऊन जाण्यासाठी मृतक शेहबाज हा शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मुमताजच्या घरी आला; मात्र, मुले घेऊन जाण्यास मुमताजने विरोध केल्याने पती-पत्नीमध्ये वाद झाला. याच वादातून तीन मेहुण्यांनी मिळून शेहबाजला बेदम मारहाण करत हातोडीने प्रहार केले. यात त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात:यानंतर तिन्ही मेहुण्यांनी शेहबाजचा मृतदेह घराबाहेर खेचत आणत रिक्षात टाकला आणि नदीत फेकून दिला. विशेष म्हणजे, तीन मेहुण्यांमध्ये हेमंत बिचवाडे हा मुमताजच्या आई-वडिलांनी दत्तक घेतलेला मुलगा असल्याचे समोर आले. दरम्यान शुक्रवारी रात्री १० वाजल्याच्या सुमारास मुमताज ही पती बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी खडकपाडा पोलीस ठाण्यात आली होती. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेहबाज बेपत्ता असल्याची नोंद करून तपास सुरू केला. सायंकाळच्या सुमारास तीन मेहुण्यांनी मिळून केलेल्या बेदम मारहाणीत शेहबाजचा मृत्यू झाला. यानंतर त्याचा मृतदेह रिक्षातून नेऊन नदीत फेकल्याचे पोलिसांनी कळले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आज (शनिवारी) पहाटेच्या सुमारास तिघांना ताब्यात घेतले.