ठाणे- कळवा येथील अभिनेत्री प्रज्ञा प्रशांत पारकर (वय ४० वर्षे) हिने शुक्रवारी मुलगी श्रृती (वय १७ वर्षे) हिची हत्या करत स्वत: आत्महत्या केली होती.पतीमुळेच तिने मुलीची हत्या करून स्वतः मृत्यूला कवटाळल्याचे तिच्या सुसाईड नोटवरून (चिठ्ठी) समोर आले आहे. त्यानुसार, कळवा पोलीस ठाण्यात मुलीच्या हत्येप्रकरणी मृत अभिनेत्री प्रज्ञा हिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती प्रशांत पारकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
ठाण्यातील अभिनेत्री आत्महत्या प्रकरणी पती अटकेत
त्यानुसार,शुक्रवारी दोघींवर अंत्यसंस्कार आटोपताच पती प्रशांत याला अटक करण्यात आली. ठाणे न्यायालयाने त्याला १३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती कळवा पोलिसांनी दिली.
शुक्रवारी (९ ऑगस्ट) सकाळच्या सुमारास अभिनेत्री प्रज्ञा पारकर हिने कळव्यातील राहत्या घरात मुलगी श्रृती हिची तोंड, नाक आणि गळा दाबून हत्या करीत स्वतःही स्वयंपाक खोलीमधील पंख्याला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी प्रज्ञा हिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला. तर पती प्रशांत पारकर यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
प्रज्ञा यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये अनेक बाबींचा उलगडा झाला आहे. चिठ्ठीच्या पान नंबर १ वर आत्महत्या करत आहे श्रृतीसकट, फसलेले लग्न, तुटलेल्या संसाराचे ओझे आता नाही जमत कॅरी करायला. प्रशांत सोडून माझ्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही, असे स्पष्ट म्हटले आहे. त्यानुसार, प्रशांत याने वेळोवेळी दिलेल्या मानसिक त्रासामुळे प्रज्ञा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे समोर आले असून पोलिसांनीच प्रशांत पारकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. सध्या प्रशांत पारकर पोलीस कोठडीत आहे.