ठाणे -भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात स्टेम प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा केला जातो. मात्र ज्या मोठ्या जलवाहिनीतून गावकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यात येतो, त्या जलवाहिनीला शेकडो अनधिकृत नळ जोडणी झाल्याचे समोर आले होते. या गंभीर प्रकाराविषयी गावकऱ्यांनी स्टेम प्राधिकरणाकडे कारवाईची मागणी केली होती. मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याने गावकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने स्टेम प्राधिकरणाला कारवाईचे आदेश दिल्याने मोठ्या पोलीस बंदोबस्तात आज शेकडो अनधिकृत नळ जोडण्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
भिवंडी, ठाणे व मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रासह भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रास पाणी पुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाकडून भिवंडी पालिकासह ग्रामपंचायत क्षेत्रात पाणी पुरवठा केला जातो. मात्र मोठ्या जलवहिनीतून अनधिकृत नळ जोडणी करणारी पाणी माफियाची टोळी आर्थिक हित साध्य करीत बिनधास्तपणे नळ जोडणी करत आहे. त्यातच भिवंडी तालुक्यातील कांबे ग्रामपंचायत क्षेत्रासाठी स्टेम प्राधिकरणाकडून दररोज एक एमएलटी पाणीपुरवठा केला जातो. परंतु ही पाईपलाईन भिवंडी शहरातील ज्या भागातून जात आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळ जोडणी झाल्याने या ग्रामस्थांना कमी दाबाने अत्यल्प असा पाणी पुरवठा होत असल्याने कित्येक वर्षे याबाबत संघर्ष करूनही या परिस्थितीत बदल न झाल्याने ग्रामस्थांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करत दाद मागितली होती.