ठाणे -महाराष्ट्रभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत जात असतानाच रुग्णांना प्लाज्मासाठी वणवण फिरावे लागत आहे. ठाण्यातील झेप प्रतिष्ठान यांनी गेल्या वर्षीपासूनच प्लाज्मा दान करण्यासाठीचे 'माणुसकीचे चॅलेंज' सुरू केले आहे. त्याद्वारे संकट काळात मदतीचा हात देणाऱ्या या झेप प्रतिष्ठान संस्थेने गेल्या महिन्यात 74 रुग्णांना प्लाज्मा मिळवून दिला आहे. प्लाज्मा दान करा आणि माणुसकीचे चॅलेंज द्या, असे आवाहन झेप प्रतिष्ठानच्यावतीने नागरिकांना देण्यात आले आहे.
लोकांनी पुढे येऊन प्लाज्मा दान करा -
संकट काळात मदत करण्यासाठी झेप प्रतिष्ठानही उतरले आहे. संस्था ठाण्यातच नव्हे, तर महाराष्ट्रातील प्रत्येक भागात विविध संस्था व ब्लड बँक आणि प्लाज्मा दात्यांकडून मदत मिळवून रुग्णांना हॉस्पिटल बेड प्लाज्मा रक्त रुग्णवाहिका आणि इंजेक्शन मिळवून देण्याचे प्रयत्न करीत आहेत. गेल्या 15 दिवसांत तब्बल 74 जणांना प्लाज्मा 24 बेड 17 इंजेक्शन तसेच दोन रक्तदाते दिले आहेत. नागरिकांसाठी पूर्णपणे 24 तास मदत करणाऱ्या झेप प्रतिष्ठान संस्थेला दिवसातून शंभर फोन येत असतात. पण रुग्णांच्या वाढलेल्या संख्येमुळे सर्व सुविधांवर ताण येत असून भरपूर वेळा रुग्णांना मदत मिळत नाही, अशी खंत प्रतिष्ठानचे विकास धनावडे यांनी व्यक्त केली. कोरोनातून बरे झालेले रुग्ण काही बाबींचा पूर्तता केल्यावर किमान दोन रुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे बरे झालेल्या लोकांनी पुढे येऊन प्लाज्मा दान करा व कोरोनाशी झुंज देत असलेल्या रुग्णांचे प्राण वाचवा, असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.