ठाणे - जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशाला पायदळी तुडवत नागरिकांनी मुंब्रा देवी डोंगरातील धबधब्यावर गर्दी केल्याचे समोर आले आहे. यावेळी नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब न केल्याचे दिसून आले. याकडे पोलिसांनी देखील दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा -बदलापूर क्षेत्रातील नालेसफाई दावा फोल; काढलेला गाळ पुन्हा नाल्यातच
सध्या करोना काळ असल्यामुळे राज्यात कलम 144, म्हणजेच जमावबंदीचा आदेश लागू आहे. शिवाय ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार ठाण्यातील सर्वच धबधबे, नद्या, तलाव आणि पर्यटनस्थळे या सर्वच ठिकाणी नागरिकांना जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. असे असताना देखील मुंब्रा देवी डोंगरातील धबधब्यावर आज सकाळपासूनच नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. धक्कादायक म्हणजे, या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला न गेल्याचे दिसून आहे. नागरिकांनी मास्कचा वापर देखील टाळल्याचे समजले. या सर्व प्रकारामुळे मुंब्रा येथे जमावबंदीचे आदेश किंवा पर्यटनस्थळांवर जाण्यास मनाईचे आदेश लागू होत नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे.