ठाणे :राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ब्लड लाईन या रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मादान केले. आव्हाड यांच्यासोबत शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनीदेखील प्लाझ्मादान केले. यावेळी त्यांनी, कोरोनातून मुक्त झालेल्या सर्वच लोकांनी प्लाझ्मादान करावे. जेणेकरुन इतर रुग्णांना त्याचा लाभ होईल, असे आवाहन केले.
जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यावर त्यांनी मात केली आहे. आयसीएमआरच्या संशोधनामध्ये कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा प्लाझ्मा उपचारासाठी लाभदायक ठरत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे आव्हाड यांनी ब्लडलाईन रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मा दान केले. यावेळी कोरोनावर मात केलेले शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनीदेखील आव्हाड यांच्यासोबत प्लाझ्मादान केले. यावेळी आव्हाड म्हणाले, जर कोरोनातून मुक्त झालेल्या प्रत्येक व्यक्तीने प्लाझ्मा दान केला तर महाराष्ट्र कोरोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळेच आपण हे दान केले आहे. इतरांनीही हे दान करावे. तर, आनंद परांजपे यांनी, आम्ही कोरोनावर मात केली आहे. आता इतर कोरोनाग्रस्तांना बरे करण्याची जबाबदारी आपली आहे. त्यासाठीच आम्ही प्लाझ्मा दान केले आहे. या निमित्ताने आपण कोरोनामुक्त झालेल्या सर्वच रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करत आहोत, असे सांगितले.