ठाणे -उल्हासनगर शहरात १५ ते २० गावगुंडाच्या टोळीने तलवारी हातात घेत दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या प्रकारामुळे उल्हासनगरमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहे. रोहित झा, नंनु राय, सुधाकर यादव, लल्ली, संतोष, हरचंद आणि सूरज लोट यांच्या टोळीने ही दहशत माजवली आहे.
रोख रक्कम आणि दागिने लुटले -
उल्हासनगर कॅम्प नंबर दोनच्या हनुमान नगर परिसरात रात्री एकच्या सुमारास १५ ते २० गुंड हातात तलवारी, लोखंडी रॉड घेऊन रहिवाशांच्या घरात घुसले. त्यांनी मिळेल त्या घरात घुसून तोडफोड करीत मोठ्या प्रमाणात लूटमार केली. या गुंडांनी दहापेक्षा अधिक घरे तर अनेक गाड्यांची तोडफोड केली. उल्हासनगरमधील एका सराईत गुंडाची ही टोळी असल्याची माहिती समोर आली आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.