ठाणे- राज्य शासनाने हॉटेल्स सुरू करण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार ठाण्यातील प्रख्यात मामलेदार मिसळचे हॉटेल आता खवय्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन आणि ग्राहकांच्या नोंदी ठेवून दर्दी खवय्यांसाठी हे हॉटेल सुरू करण्यात आले असल्याचे हॉटेलचे चालक लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांनी सांगितले.
तिखट, झणझणीत मिसळ खाण्यासाठी सबंध जिल्ह्याभरातील दर्दी खवय्ये ठाण्यातील तहसील कार्यालयाबाहेरील मामलेदार मिसळ हॉटेलमध्ये येत असतात. मात्र, कोरोनामुळे गेले सहा महिने हे हॉटेल बंद होते. तर, गेल्या महिनाभरापासून या हॉटेलमध्ये पार्सल स्वरुपात मिसळचे वितरण होत होते. मात्र, सायंकाळी सहा-साडे सहा वाजताच हे हॉटेल बंद करण्यात येत असल्याने खवय्यांचा हिरमोड होत होता. लॉकडाऊन काळाचा सदुपयोग करून या हॉटेलमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळता यावे, या उद्देशाने रचनेमध्ये बदल करून हॉटेल सुरू करण्यात आले आहे.