नवी मुंबई- गंभीर अवस्थेत महापालिका रुग्णालयात आणलेला रुग्ण मंगळवारी मध्यारात्री दगावला. मात्र, त्यानंतर त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात घुसून तोडफोड केल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. तसेच या नातेवाईकांनी शस्त्रांच्या साहाय्याने डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांना मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी काही नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे. डॉक्टरांवर झालेल्या या हल्ल्याचा निषेध करत नवी मुंबई महापालिका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले आहे.
रुग्ण दगावल्याने नातेवाईकांनी केली पालिका रुग्णालयाची तोडफोड - doctor beaten by relatives of patients
वाशी येथील पालिका रुग्णालयात रुग्ण दगावल्याने नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केल्याचा प्रकार घडला आहे. तसेच शस्त्रांसह आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात घुसून डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे. यानिषेधार्थ रुग्णालयक कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
मंगळवारी दुपारी नवी मुंबईतील जुहूगाव येथील 48 वर्षीय व्यक्तीला अत्यवस्थ अवस्थेत वाशी येथील पालिका रुग्णालयातील नॉन कोविड विभागात दाखल केले होते. तत्पूर्वी रुग्णावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजता रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही माहिती रुग्णाच्या नातेवाईकांना कळवताच ते संतप्त झाले व त्यांनी आज (बुधवार) पहाटे 3 वाजण्याच्या सुमारा पालिका रुग्णालयावर हल्ला केला. तसेच सुरक्षारक्षक, परिचारिका आणि डॉक्टरांनाही मारहाण करत त्यांनी रुग्णालयाची तोडफोड केली. यावेळी काहींच्या हातात धारदार शस्त्रे होती, अशी माहिती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
नातेवाईकांनी केलेल्या हल्ल्यात रुग्णालयाचे कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळावरून काही नातेवाईकांना ताब्यात घेण्यात आले आहे. रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध करत वाशी मधील पालिका हॉस्पिटलमध्ये सर्वांनी काम बंद आंदोलन केले आहे.