महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जादा बिले आकारणाऱ्या रुग्णालयांवर पालिकेची कारवाई, १ कोटी ८२ लाख रुपये रुग्णांना परत मिळणार - thane hospitals unreasonable bill charge

आतापर्यंत ठाणे महापालिकेने या रुग्णालयांकडून २६ लाख ६८ हजार वसूल केले असून विविध रुग्णालयांनी १५ लाखांचा खुलासा देखील केला आहे. पालिकेनेही तो मान्य केला असून, त्यामुळे १५ लाख आणि २६ लाख, असे एकूण ४१ लाख या रुग्णालयांकडून वसूल करण्यात आले असले, तरी उर्वरित आक्षेपार्ह रकमेचा खुलासा या रुग्णालयांना द्यावाच लागणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

होरायझन प्राईम
होरायझन प्राईम

By

Published : Aug 24, 2020, 4:49 PM IST

ठाणे- कोरोना उपचारासाठी खासगी रुग्णालयांनी सर्वसामान्य रुग्णांकडून केवळ ४० दिवसांमध्ये १ कोटी ८२ लाख रुपये जादा बिले आकारली होती. आता पालिका प्रशासनाकडून कारवाईनंतर रुग्णांना त्यांचे पैसे परत मिळणार आहे. ठाणे महापालिकेच्या लेखापरीक्षकांनी दिलेल्या अहवालात ही बाब उघड झाली आहे.

माहिती देताना ठाणे महानगरपालिका आयुक्त

आतापर्यंत ठाणे महापालिकेने या रुग्णालयांकडून २६ लाख ६८ हजार वसूल केले असून विविध रुग्णालयांनी १५ लाखांचा खुलासा देखील केला आहे. पालिकेनेही तो मान्य केला असून त्यामुळे १५ लाख आणि २६ लाख, असे एकूण ४१ लाख या रुग्णालयांकडून वसूल करण्यात आले असले, तरी उर्वरित आक्षेपार्ह रक्कमेचा खुलासा या रुग्णालयांना द्यावाच लागणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्वसामान्य रुग्णांकडून अतिरिक्त बिल वसूल करणाऱ्या खासगी रुग्णालयांच्या बाबतीत पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी कडक धोरण अवलंबले आहे. त्यानुसार अवाजवी बील आकारणाऱ्या होरायझन प्राईम या रुग्णालयाची कोविडची मान्यता रद्द करण्यात आली असून एक महिन्यांची नोंदणी रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय घेऊन शर्मा यांनी खासगी रुग्णालयांना इशारा दिला आहे. आयुक्तांच्या या सडेतोड भूमिकेनंतर आता इतर खासगी कोविड रुग्णालयांचे धाबे दणाणले असून रुग्णांकडून वसूल केलेली आक्षेपार्ह रक्कम या रुग्णांना परत देण्यास त्यांच्याकडून सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर या सर्व रुग्णालयांच्या बिलांची तपासणी करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून लेखापरीक्षकांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे काम देखील सुरू झाले आहे.

समितीने दिलेल्या अहवालानुसार, १० जुलै ते २१ ऑगस्ट दरम्यान विविध रुग्णालयांनी कोरोनाच्या उपचारासाठी पावणे दोन कोटींची आक्षेपार्ह रक्कम वसूल केली असल्याचे लेखापरीक्षकांच्या अहवालांमधून स्पष्ट झाले आहे. यामध्ये आतापर्यंत ४ हजार १०६ बिले मिळाली असून ३ हजार ३४७ बिले तपासण्यात आली आहेत, तर २६ लाख ६८ हजार ९६४ इतकी रक्कम रुग्णांना परत देण्यात आली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दुसरीकडे अवाजवी बिल आकारणाऱ्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, या कारवाईत रुग्णालय बंद करणे हा उद्देश नसून रुग्णांना त्यांचे पैसे परत मिळणे आणि शासकीय दराने रुग्णांना बिल आकारणे हा उद्देश असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

एकूण प्राप्त देयके- ४ हजार १०६

तपासणी झालेली- ३ हजार ३४७

आक्षेपार्ह देयके- १ हजार ३६२

जादा आकारणी केलेली देयकांची रक्कम- १ कोटी ८२ लाख ३९ हजार ७७६

रुग्णांना परत केलेली रक्कम- २६ लाख ६८ हजार ९६४

खुलाशानुसार मान्य केलेली रक्कम- १५ लाख २७ हजार १९

आजही मुजोरी सुरूच

पालिकेने आपली कारवाई केली असतानाही अनेक खासगी रुग्णालय आजही अवाजवी बिले आकारत असल्याचे पालिका प्रशासनाला आढळले आहे. आता यावर ठोस कारवाई करणे पालिका प्रशासनाला अवघड जात आहे. कारण त्यांच्याकडे उपचार सुरू आहेत आणि अशा वेळी रुग्णांची अडचण होऊ नये म्हणून पालिका गंभीर कारवाई करू शकत नाही, असेही महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा-धक्कादायक; संपत्तीच्या वादातून मामांंचा भाच्यावर गोळीबार, 7 जणांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details