ठाणे- मुरबाड तालुक्यात पाणी टंचाई दूर करण्यासाठी सरकारने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला. मात्र, पाण्यासाठी महिलांची भटकंती आजही सुरूच आहे. धसई गावाजवळ कळंबाड ग्रामपंचायत अंतर्गत येणारी दुर्गापूर ही आदिवासी समाजाची वस्ती आहे. या वस्तीत पाण्यासाठी चक्क अंगाला हळद लागलेल्या नवरी मुलीला विहिरीवर जावे लागत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.
नवरी मुलगी अरुणा वाघ बोलताना
अरुणा तानाजी वाघ असे पाण्यासाठी भटकंती करत असलेल्या नवरी मुलीचे नाव आहे. आज तिची हळद असल्याने सायंकाळी तिच्या घरी पाहुणे मंडळी येणार होती. तेव्हा त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी तिनेच चक्क डोक्यावर हंडा घेत, तळ गाठलेल्या विहिरीवर पाण्यासाठी धाव घेतली. मात्र, त्याही विहिरीने तळ गाठल्याने, तिला दोन हंडे पाणी भरण्यासाठी किमान १ तासभर वेळ लागला.
आज अरुणाची हळद आहे. तर उद्या (मंगळवारी) तिचा शहापूर तालुक्यातील टाकीपठार येथील रहिवासी याच्याशी लग्न सोहळा पार पडणार आहे. तरी तिला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यावरून आपण अंदाज लावू शकता की, या भागात पाणीटंचाईमुळे किती त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. मागील २ वर्षांपासून या परिसरातील गावांना उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई असताना प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात नाही. चक्क एका नवरी मुलीला आपल्या लग्नाच्या हळदी दिवशीच पाणी भरण्यासाठी विहिरीवर जावे लागते. यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट नसल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.
मुरबाड तालुक्यात भीषण पाणीटंचाई असून मार्च महिना संपत आला तरी शासनाचे टँकरने पाणी पुरवठा सुरू केला नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी 'आधी पाणी द्या, मग मत मागा' असा पावित्रा घेतला आहे. एकंदरीतच आदिवासी पाडे, वस्तीमध्ये पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यात शासनाला अपयश आल्याचे दिसून येत आहे.