ठाणे - श्रावण महिन्यातला सोमवार म्हटलं ( Shravan month ) कि ठाणेकरांना ओढ लागते ती ठाण्याच ग्रामदैवत ( Village Deity Kaupineswar Temple of Thane ) असलेल्या कौपिनेश्वर मंदिरातील श्री शंकराच्या दर्शनाची. कोरोना काळात ( Covid -19 ) गेली दोन वर्ष भाविकांना दर्शनासाठी बंद असलेलं श्री शंकराच कौपिनेश्वर मंदिर आता ठाणेकरांना ( Kopeneshwar Temple In Thane) दर्शनासाठी खुलं झाले आहे. या ठिकाणी ठाणेकर दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतांना पाहायला मिळत आहेत. त्यातच महत्वाचं म्हणजे पेशवेकालीन असलेल्या या ऐतिहासिक मंदिराच नव्याने जीर्णोद्धार देखील लवकरच होणार आहे. त्यापूर्वी कस आहे हे कौपिनेश्वर मंदिर, काय आहे या मंदिराच वैशिष्ट्य आणि इतिहास ( History of Kaupineswara Temple ) जाणून घेऊयात.
17 व्या शतकात मंदिराचा जीर्णोद्धार -सुमारे हजार ते अकराशे वर्षांचा इतिहास असलेले ठाण्यातील श्री कौपिनेश्वर मंदिर म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. संपूर्ण राज्यभरातून येथे भाविक दर्शनासाठी येत असतात. साधारण १७६० मध्ये म्हणजेच 17 व्या शतकात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराबद्दल आख्यायिका अनेक आहेत. त्यापैकी तीळातीळाने येथील शंकराची पिंडी मोठी होते, अशी भाविक आख्यायिका सांगतात. त्यामुळे भाविक आवर्जून येथे दर्शनासाठी येत असतात. कौपिनेश्वर मंदिर हे केवळ भगवान शंकरांचे मंदिर नसून, पिंडीच्या मुख्य गाभाऱ्याखेरीज मंदिराच्या आवारात अन्य देवतांची लहान मंदिरे देखील आहेत. त्यामुळे दत्तजयंती, हनुमान जयंती, नवरात्र, रामनवमी, महाशिवरात्र असे उत्सव मंदिरात नियमित साजरे केले जातात.
१२ देवदेवतांच्या देवळांचे एक संकुल -शंकराची पिंडी असलेले हे मंदिर अतिशय पुरातन आहे. मात्र, बाकी मंदिरे कालांतराने भाविकांनी बांधली आहेत. जागेचा परिसर पहिल्यापासूनच मोठा आहे. त्यामुळे मंदिरांची जागा सोडून अन्य आवार अतिशय मोठे आहे. शहराच्या मध्यवस्तीत असूनही येथील वातावरणावर गर्दीचा परिणाम होत नाही. सध्या श्रावणातील सोमवारी हजारोंच्या संख्येत भाविक दर्शनासाठी राज्यभरातून येतात. शिवभक्त शिलाहार राज्याची पार्श्वभूमी, नैसर्गिक तलावांचे सौंदर्य लाभलेल कौपिनेश्वर मंदिर म्हणजे नुसते देऊळ नसून तिथे विठ्ठल रखुमाई, दक्षिणाभिमुख हनुमान मंदिर, शितलादेवी, गणपती, कालिकादेवी आदी जवळपास १२ देवदेवतांच्या देवळांचे एक संकुल आहे. या मंदिराच्या भोवती असलेल्या विस्तिर्ण अशा मासुंदा तलावाचा संकोच झाला आहे. हजारो वर्षाचा इतिहास असलेल्या या वास्तूचा जिर्णोध्दार १७६१ मध्ये पेशव्यांचे सुभेदार यांनी केला होता अशी माहिती कौपिनेश्वर मंदिर ट्रस्ट चे सचिव रवींद्र उतेकर यांनी दिली.