ठाणे - राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने हिरेन यांच्या कुटुंबियांची सुमारे तीन तास चौकशी केली. अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ, त्याचा पाठलाग करणारी इनोव्हा या गाड्याविषयी काही माहिती आहे का, स्कॉर्पिओ कार कोण वापरात होते, हे तपासण्यासोबतच पथकाने कार कुठे सर्व्हासिंगला देता आदी प्रश्नांची सरबत्ती केल्याचे समजते.
तपास एनआयएकडे -
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने हाती घेतला आहे. या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा 5 मार्च रोजी मुंब्राच्या खाडीत मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले. यावरून राज्याचे राजकारण तापले असतानाही तपासावरून राज्य व केंद्रा असा वाद निर्माण झाला आहे. आधी गुन्हे अन्वेषण विभागाकडे असलेला तपास राज्य सरकारने एटीएसकडे सोपवला. त्यानंतर या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे एनआयएची एंट्री झाली. त्यामुळे स्फोटकांनी भरलेल्या कारचा तपास एनआयएकडे, तर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एटीएस तपास करणार आहे. त्यामुळे मनसुख हिरेन यांच्या पत्नी व मुलाला दोन विविध यंत्रणेच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे.