ठाणे- आपल्या वडिलांनी एका मुसलमान स्त्रीला बहीण मानले व त्यामुळेच एक हिंदू व्यक्ती रमजान महिन्यातले रोजे ठेऊ लागला आहे. गेली 40 वर्षे सुरेंद्र अर्जुनराव शिंदे ही व्यक्ती मुस्लिम धर्मियांचे पवित्र रमजान महिन्यातले रोजे पाळत आहे. खतिजाबी हाफिज शेख या महिलेला आपल्या वडिलांनी बहीण मानले, त्यामुळेच आपल्याला इस्लाम व रमजानबद्दल माहिती मिळाली ज्यामुळे आपण रोजे ठेऊ लागलो असे ते अभिमानाने सांगतात.
त्यांचा अभ्यास हा केवळ उपवास पाळण्यापुरता नसून आपल्याला कुराणमधील आयते आणि इतर माहिती आणि पाठ असल्याचे ते सांगतात. फक्त रमजानचा नाही तर मुस्लिम धर्मियांच्या मोहरमचे ताजिये आपण बनवल्याचे ते सांगतात. आपणच नाही तर शेख कुटुंबदेखील सर्व हिंदू सण मोठ्या उत्साहाने साजरे करत असे त्यांनी सांगितले. याच आपल्या मानलेल्या मुसलमान आत्येला मूल होत नव्हते तेव्हा तिने गणपतीला नवस केला व तो पूर्ण झाल्यावर आपल्या मुलाच्या डोक्यावरून बाप्पांना घरी आणून गणपतीची स्थापना केली याची आठवण सांगताना सुरेंद्र शिंदे भावूक झालेले दिसले.