ठाणे - उल्हासनगर शहरातील एका जीन्स व्यापाऱ्याचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. मोबाईल लोकेशन व सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अपहरणकर्त्या चौकडीला हिललाईन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सनी अनवाणी असे अपहरण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
सनी अनवाणी या जीन्स विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याचे ५० लाखांच्या खंडणीसाठी रिक्षातून अपहरण झाले होते. मागील आठवड्यात सनी नेहमीप्रमाणे उल्हानसागरमधील घरातून निघाले. भाटीया चौकातून रिक्षाने प्रवास करून दुकानात जात होते. ठरल्या वेळेत घरातून निघून दुकानात जाण्यास एका रिक्षात बसले. मात्र, रिक्षाचालकाने रिक्षा दुकानाच्या दिशेने न वळवता थेट अनोळखी दिशेने वळवली. त्यामुळे सनीला संशय आला आणि त्याने धावत्या रिक्षातून मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. मात्र, पाऊस जोरात पडत असल्याने सनी यांचा आवाज नागरिकांपर्यंत ऐकू गेला नाही. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी सनी यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बेदम मारहाण करीत कल्याण तालुक्यातील रायता नदीच्या दिशेने नेले. या ठिकाणी पोहचताच सनीच्या मोबाईलवरून अपहरणकर्त्यांनी ५० लाखासाठी सनीच्या घरच्यांना धमकावण्यास सुरुवात केली. पैसे नाही दिले तर, सनीला जिवे मारण्याची धमकी घरच्यांना दिली. यामुळे सनीच्या वडिलांनी घाबरून तत्काळ हिललाईन पोलीस ठाणे गाठून हा प्रकार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सावंत यांना सांगितला.