मीरा भाईंदर (ठाणे) -मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालय हे महाराष्ट्रात आधुनिकतेचे प्रतीक ठरेल. या आयुक्तालयाचा आदर्श इतरही आयुक्तालये डोळ्या समोर ठेवतील, असे गौरव उदगार पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी काढले. ते पोलीस नियंत्रण कक्ष, वेबसाईट, परिषद कक्ष उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
नियंत्रण कक्ष,वेबसाईट उद्घाटन -
मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयात आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आलेल्या पोलिस नियंत्रण कक्ष, वेबसाईट व परिषद कक्ष चे उदघाटन प्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले, अत्यंत कमी दिवसात आयुक्तलयाने महापालिकेच्या वास्तूत अद्यावत कार्यालय सुरू केले. स्वतंत्र इमारत, कमी कर्मचारी असतानाही चांगली कामगिरी बजावत नियंत्रण कक्ष, वेबसाईट सुरू केली. नियंत्रण कक्षासाठी सहाय्यक आयुक्त दर्जाचे अधिकारी देण्यात आले आहेत. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वाढीसाठी एका समितीचे गठन करण्यात आले असून त्यात उपायुक्त (गुन्हे), ठाणे ग्रामीण पोलिस अधिक्षक, पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक यांचा समावेश आहे. समिती जिल्ह्यातील तसेच बाहेरील कर्मचाऱ्यांची तपासणी करून त्यांना या आयुक्तालयात समाविष्ट करून घेतील.