ठाणे - लॉकडाऊनच्या काळात सर्व कामगारांना माणुसकीच्या दृष्टीने सांभाळून घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योगपती आणि व्यावसायिकांना केले होते. टाटा, अंबानी सारख्या अनेक उद्योगपतींनी मदत करुन सामाजिक बांधिलकी जपली. मात्र, काही स्वार्थी व्यापाऱ्यांनी मराठी कामगारांना तडकाफडकी कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. अशा व्यापाऱ्यांविरोधात तकार करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक देण्याची, मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. याबाबत सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिले आहे.
मुंबई आणि मराठी कामगारांच्या जिवावर काही व्यापाऱ्यांनी बलाढ्य साम्राज्य निर्माण केले आहे. मात्र, आता कोरोनाच्या कठीण काळात याच मराठी कामगारांना उद्योगपती आणि व्यापाऱ्यांनी वाऱ्यावर टाकले आहे. अशांना वेळीच अंकुश घालणे गरजेचे आहे. ओबेरॉय बिल्डरच्या बाबतीतही अनेक तक्रारी येत आहेत. असे अनेक बिल्डर आहेत जे कुठलीही पूर्व कल्पना न देता कामगारांना कामावरून काढून टाकत आहेत. त्यामुळे अनेक कामगारांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. नैराश्यातून भविष्यात आत्महत्येसारखी पावले उचलली जाऊ शकतात. त्यामुळे या कामगारांना वेळीच मदत करणे गरजेचे आहे, असे प्रताप सरनाईक यांनी निवेदनात म्हटले आहे.