ठाणे- कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. राज्यातही या महामारीने पाय पसरायला सुरुवात केली आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी झपाट्याने वाढत असल्याने सध्या चिंतेचे वातावरण आहे. देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, नागरिकांकडून या लॉकडाऊनचे गांभीर्याने पालन होताना दिसत नाही. त्यामुळे ठाण्यातील तरुणांना सतर्क होत खडा पहारा द्यायला सुरुवात केली आहे.
लॉकडाऊनमध्ये बिनधास्त फिरणाऱ्यांना चाप बसावा, यासाठी ठाण्यातील लक्ष्मी चिराग नगरमधील तरुण पुढे सरसावले आहेत. नगराच्या मुख्य 2 प्रवेशद्वाराजवळ एक चेक पोस्ट तयार करण्यात आले आहे. यामध्ये बाहेरील कोणत्याही व्यक्तीला नगरात प्रवेश दिला जात नाही. तर स्थानिक नागरिकांनादेखील विनाकारण बाहेर जाण्यास मज्जाव केला जातो.