महाराष्ट्र

maharashtra

ठाण्यात पावसाने उडवली दाणादाण; अनेक भागात पाणी साचले

By

Published : Jul 18, 2021, 8:51 PM IST

Updated : Jul 18, 2021, 9:10 PM IST

पश्चिम डोंबिवलीकडील टेलकोसवाडी आणि राहूलनगर परिसरात पाणी तुंबले. तर आण्णानगर भागातही पाणी घुसल्याने जुनी डोंबिवली भागातील काही बैठ्या चाळींमध्ये पाणी घुसले. त्यामुळे या भागातील रहिवाशांची ऐनवेळी मोठी पंचाईत होऊन त्यांना आपल्या सामानासाठी धावपळ करावी लागली आहे.

ठाणे पाऊस
ठाणे पाऊस

ठाणे - गेल्या काही दिवसांपासून वरूणराजाने आपला वेग मंदावला होता. मात्र दिवसभर रिपरिपणाऱ्या पावसाने कल्याण-डोंबिवलीकरांची त्रेधातिरपीट उडवून दिली आहे. तुंबलेली गटारे, बैठ्या घरांत घुसलेले पाणी उपसताना चाळकऱ्यांची झालेली दमछाक आणि रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे व्यापारी-दुकानदार-पादचारी-वाहन चालकांची फजिती झाल्याचे पहायला मिळाले.

ठाण्यात पावसाने उडवली दाणादाण
नालेसफाईच्या दाव्याबाबत नागरिकांनी केले प्रश्नचिन्ह उपस्थित

एकीकडे हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे पावसाने दमदार हजेरी लावत कल्याण-डोंबिवलीकरांना सुखद दिलासा दिला आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यावेळीही पाणी साचलेले पहायला मिळाले. काही ठिकाणी घरांत, तर काही सार्वजनिक ठिकाणी असलेल्या दुकानांमध्ये गटाराचे पाणी शिरल्याने रहिवाशांसह दुकानदारांची पळापळ झाली. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने केलेल्या नालेसफाईच्या दाव्याबाबतही नागरिकांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

बैठ्या चाळींतील घरात पाणीच पाणी

कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, डोंबिवली पूर्व, एमआयडीसीचा निवासी विभाग, आदी परिसरात पाणी साचल्याच्या तक्रारी होत्या. आधीच कोरोनाच्या भितीने नागरिक धास्तावले असतानाच रात्रीपासून पावसाची संततधार सुरू झाल्याने घरात बसलेल्या रहिवाशांची द्वीधा मन:स्थिती झाली आहे. संततधार पाऊस असताना कुठेही कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. मात्र पावसामुळे सखल भागात राहणाऱ्या बैठ्या चाळींतील घरात पाणी घुसल्याने अनेक रहिवाशांचे नुकसान झाले. पश्चिम डोंबिवलीकडील टेलकोसवाडी आणि राहूलनगर परिसरात पाणी तुंबले. तर आण्णानगर भागातही पाणी घुसल्याने जुनी डोंबिवली भागातील काही बैठ्या चाळींमध्ये पाणी घुसले. त्यामुळे या भागातील रहिवाशांची ऐनवेळी मोठी पंचाईत होऊन त्यांना आपल्या सामानासाठी धावपळ करावी लागली आहे. तसेच पूर्वेकडील गांधीनगर, मिलापनगर, अंबिकानगर, स्टारकॉलनी, रामनगर, आयरेगाव, भोपर परिसरातील रस्त्यांवर पाणी साचले. रेल्वे स्थानक जवळील पूर्व-पश्चिम रस्त्यावर पाणी जमा झाले होते.

कल्याण, डोंबिवलीच्या स्टेशन रोड पाण्याखाली

पश्चिमेकडे असलेल्या खाडीकिनारी कोपरगाव, जुनी डोंबिवली, ठाकूरवाडी, मोठागाव, देवीचापाडा, गरीबाचा वाडा, नवापाडा, चिंचोड्याचा पाडा, कुंभारखानपाडा, बावन चाळ, ठाकूरवाडी, कचोरे, आदी परिसरात तुंबलेल्या पाण्यामुळे अनेकांना अडचणी आले. डोंबिवलीचा स्टेशन रोड, नेहरू रोड, पाटकर रोड, केळकर रोड, इंदिरा गांधी चौकात पाणी साचले होते. मोहने गावठाण येथे गटारे तुंबल्याच्या तक्रारी आले. कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिर्ला कॉलेज परिसर, आरटीओ ऑफिस, सह्याद्री नगर, मिलींदनगर, रामबाग परिसर, गांधीधाम व गणेश मंदिर, तसेच कल्याणच्या स्टेशन परिसरासह पूर्वेकडील चक्कीनाका, तिसगाव, खडेगोळवली, पिसवली, आदी भागांत पाणी साचले. तर पावसाच्या तडाख्याने नांदीवलीच्या स्वामी समर्थ चौकाला सालाबादप्रमाणे यंदाही तळ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून आले.

...म्हणून मार्गावरही पाणी

पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकत नसल्याने कल्याण-शिळ मार्गावरही पाणी साचले होते. परिणामी अशा पाणी साचलेल्या रस्त्यातून मार्ग काढताना वाहनांची कोंडी झाल्याचे पहायला मिळाले. डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील खड्डेमय रस्त्यांत तळी निर्माण झाली. अशा तळ्यांतून वाट काढण्यात पादचाऱ्यांसह वाहनचालकांना वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दिसून आले. मिलापनगर भागात तर अतिवृष्टीमुळे रस्त्यावर आणि सोसायटी आणि बंगल्यांच्या आवारात जवळपास दोन-अडीच फुटापर्यंत वाहत होते. जर असाच पाऊस पडत राहिला तर घरात पाणी शिरण्याची शक्यता आहे. येथील काही मोठे नाले पाण्याने काठोकाठ भरले असून त्यातून बाहेर पाणी येणे चालू झाले आहे. सर्व्हिस रोड, वंदेमातरम् उद्यान, एम्स हॉस्पिटल रोड, इत्यादी ठिकाणी पाणी साचलेले असून असाच पाऊस राहिला तर रात्री घरात पाणी शिरण्याची भीती रहिवासी व्यक्त करत आहेत.

Last Updated : Jul 18, 2021, 9:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details