महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवी मुंबईसह पनवेल, उरण परिसराला पावसाने झोडपले; अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत - नवी मुंबई लाईव्ह पाऊस अपडेट

नवी मुंबईसह पनवेल आणि उरण परिसराला सलग चौथ्या दिवशीही पावसाने झोडपले आहे. या भागात चार दिवसात 330 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे पाणी अनेक ठिकाणी साचले तर वीज पुरवठा देखील खंडित झाला होता. नवी मुंबई शहरात 500 झाडे उन्मळून पडली.

New Mumbai Rain update
नवी मुंबई रेन अपडेट

By

Published : Aug 7, 2020, 8:30 AM IST

नवी मुंबई -नवी मुंबईसह पनवेल आणि उरण परिसराला सलग चौथ्या दिवशीही पावसाने झोडपले आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली होती. या भागात गेल्या चार दिवसांत दिवसभरात 330 मिमी. पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

चार दिवसांच्या पावसामुळे नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. नवी मुंबईतील मिलेनियम बिझनेस पार्क, ऐरोली टी जंक्शन, बाजार समितीमधील भाजी व फळ मार्केट, शिरवणे भुयारी मार्गासह एकूण आठ ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. काही ठिकाणी दोन फुटांपेक्षा जास्त पाणी भरल्याचे निदर्शनास आले. पावसामुळे बाजार समितीच्या व्यवहारावरही काही प्रमाणात परिणाम झाल्याने ग्राहकांची संख्या कमी झाली आहे.

पावसामुळे पनवेल, शहर, नवीन पनवेल, कळंबोली, खांदेश्वर, कामोठे परिसरामध्ये पाणी साचले होते. शिवाय उरण शहर व ग्रामीण भागातही पाणी साचलेले पाहायला मिळाले. नवी मुंबई पनवेल व उरण परिसरात विद्युत पुरवठा खंडीत झाला. महावितरणकडून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू असून लवकरच पावसामुळे खंडित असलेला पुरवठा सुरळीत होईल, असे महावितरण जनसंपर्क अधिकारी ममता पांडे यांनी सांगितले.

नवी मुंबई शहरात मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे 500 झाडे उन्मळून पडली आहेत. ही झाडे हटवण्याचे काम गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. उरणच्या ग्रामीण भागात पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत अनेकजण घरी ऑनलाइन कामे करत आहेत. विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details