ठाणे -भारतीय हवामान विभागाने ९ ते १२ जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच, यावर्षीही पावसाची सरासरी ९६ ते १०४ टक्के राहील, असा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावून आज पहाटेपासून जोरदार कोसळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे, दुपारपासूनच भिवंडी शहरासह ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण होऊन ठिकठिकाणी सखल भाग पाण्याखाली गेले आहे. अनेक दुकांनासह घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले आहे. सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे.
'या' परिसरांत पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल
भिवंडी शहर व ग्रामीण परिसरात पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे भिवंडी परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून बहुतांश घरांमध्ये व दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली. मात्र, दुपारनंतर पावसाने उशिरापर्यंत उसंत घेतल्याने ठिकठिकाणी सखल भागात साचलेले पाणी ओसरायला लागल्याने नागरिकांना काहीवेळ उसंत मिळाली आहे.
शहरातील काही भागांत वीज पुरवठा खंडित झाला आहे, तर यावर्षी नाले सफाईचा पहिल्याच पावसाने पोलखोल केले आहे. नाले, गटारातील पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या घरात शिरले आहे. शहरातील निजामपुरा, कणेरी, कमला हॉटेल, नारपोली, पद्मानगर, तीनबत्ती, शिवाजी नगर, सिटीजन हॉस्पिटल मेनरोड, शास्त्रीनगर , आनंद हॉटेल मागील नाला, वरालदेवी हॉस्पिटल मेनरोड, भाजीमार्केट, नजराना कंपाऊंड येथील सखल भागातील दुकाने, घरांमध्ये पाणी शिरल्याने व्यापारी व रहिवाशांचे खूपच हाल झाले आहेत.