ठाणे : जिल्हात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका भिवंडीला बसला आहे. भिवंडी शहरासह ग्रामीणमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने आज अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पाऊस संततधारेसह मुसळधारपणे कोसळत राहिल्याने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. भिवंडी शहरालगतच्या कामवारी नदीसह वारणा नदीची पातळीही पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. तर भिवंडी पारोळ रोडवरील कांबे गावच्या हद्दीत मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. दरम्यान हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पाऊसाचा जोर कायम राहिल्यास आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
या गावांचा संपर्क तुटला :जुनांदुर्खी ,कांबे ,टेंभवली,पालीवली ,गाणे ,फिरिंगपाडा ,लाखीवली ,चिंबीपाडा ,कुहे ,आंबरराई ,कुहे ,खडकी ,भुईशेत ,माजिवडे ,धामणे ,वाण्याचा पाडा आदी गावांचा भिवंडी शहराशी संपर्क तुटला आहे. भिवंडी शहरातील निजामपूरा,कणेरी,कमला हॉटेल,नारपोली,पद्मानगर, तीनबतती, शिवाजीनगर भाजीमार्केट, नझराना कंपाऊंड ,नदीनाका अशा सखल भागात पाणी साचल्यामुळे दुकानदार आणि रहिवाशांचे हाल होत आहेत. पावसाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कल्याणरोड,अंजूरफाटा,रांजणोली बायपास नाका,वंजारपटी नाका,नारपोली व शेलार ,माणकोली ,वडपे बायपास नाका अशा विविध मार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर बुधवारी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावर तब्बल १० तास वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना व वाहनचालकांना वहातूक कोंडीचा सामना करावा लागला. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील वारणा ,कामवारी ,तानसा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने तहसीलदार अधिक पाटील यांनी नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.