A student making the announcement ठाणे : प्राप्त माहिती नुसार, भिवंडी (Bhiwandi) शहरातील विस्डम अकादमी इंग्लिश स्कूल या शाळेने सहा विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकले असल्याने शाळेच्या या मनमानी कारभाराविरोधात व विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून 'शिक्षा सुधार समितीच्या' वतीने हे आंदोलन करण्यात आले होते. गुरुवार - शुक्रवार असे दोन दिवसानंतर सोमवारी पुन्हा हे आंदोलन मनपा प्रशासनासमोर सुरु होते. या आंदोलनात शहरातील ताडाळी परिसरात असलेल्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील चौदा वर्षीय बालकाने आपल्या भावना व्यक्त करतांना आमच्या आंदोनाकडे कोणीही लक्ष देत नाही आहे, म्हणून आम्ही या देशातील आहोत कि नाही, असे म्हणत थेट पाकिस्तान जिंदाबादच्या (raised slogans of Pakistan Zindabad) घोषणा दिल्या.
विद्यार्थी उच्च वर्णीय हिंदू जातीतील :विशेष म्हणजे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारा हा विद्यार्थी उच्च वर्णीय हिंदू जातीतील (Hindu student) असून, मूळचा बिहार राज्यातील आहे. त्याने अशा घोषणा का दिल्या? याबाबत पोलीस चौकशी करत असले तरी, आंदोनल यशस्वी होत असतांना अचानक तिसऱ्या दिवशी अशा प्रकारे मुलाने दिलेल्या घोषणांमुळे आंदोलन स्थगित करावे लागले. मात्र ज्या सहा विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थेने शाळेतून काढून टाकले त्या विद्यार्थ्यांना कोण न्याय देणार? असा सवाल कॉम्रेड विजय कांबळे यांनी आपली प्रतिक्रिया देतांना उपस्थित केला आहे. तसेच ज्या विद्यार्थ्याने त्या घोषणा दिल्या होत्या त्या विद्यार्थ्याचा जबाब पोलिसांनी नोंदविला आहे. मुलाने चुकून अशा प्रकारच्या घोषणा दिल्या असल्याचा जबाब पोलिसांना दिला असल्याची माहिती देखील कांबळे यांनी दिली.
काय घडलं ‘त्या’ दिवशी :शहरातील विस्डम अकादमी इंग्लिश स्कूल या शाळेने विद्यार्थ्यांसह पालकांचे वर्तन चांगले नसल्याने शाळा प्रशासनाने सहा विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकले. तसेच त्यांच्या नावे पोस्टाने शाळेतून काढल्याचे दाखले पाठवून दिल्याने पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. विशेष म्हणजे या मध्ये तीन विद्यार्थी हे शिक्षण हक्क अधिनियम ऑनलाइन द्वारे प्रवेश घेतलेले होते. या घटनेमुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये प्रचंड अक्रोश पसरला होता. या विद्यार्थ्यांना न्याय मिळावे या हेतूने कॉम्रेड विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखालील 'शिक्षा सुधार समितीच्या' वतीने पालिका प्रशासन या बाबत कोणतीही कारवाई खाजगी शाळांवर करीत नसल्याने पालिका मुख्यालया समोर गुरुवार पासून 'मेरी पाठशाळा' हे आंदोलन सुरु केले होते.
आयोजकांनी व घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्याने मागितली माफी :हे आंदोलन ५ जानेवारी पर्यंत सुरू राहणार होते. रविवारी सुट्टी असल्याने बंद असलेले हे आंदोलन सोमवारी पुन्हा मनपा मुख्यालयासमोर करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व पालकांसमोर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी उठलेल्या चौदा वर्षीय विद्यार्थ्याने आंदोलनात पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. या घोषणांमुळे आंदोलन परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घोषणानंतर आयोजकांनी व घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्याने माफी मागितली, मात्र तोपर्यंत घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील वडके पोलीस फौजफाट्यासह दाखल होत, त्यांनी हे आंदोलन विनापरवाना व शासकीय नियमांचे उल्लंघन करणारे असल्याचे कारण पुढे करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात नेले.
आंदोलनकर्त्यांची जामीनीवर सुटका :दरम्यान, भिवंडी शहर पोलीस ठाण्यात आंदोलन कर्त्यांचे जबाब या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती घेण्याचे काम सुरु आहे. घोषणा देणाऱ्या अल्पवयीन मुलाचा शोध घेऊन त्याचा जबाब नोंदवून त्यास बाल न्यायालयासमोर हजर केले. तर इतर आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करून काल त्यांना साहाय्यक पोलीस आयुक्त तथा विशेष दंड अधीकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता, १० हजार रुपये दंड आकारून तसेच वर्षभर शांतता राखण्याच्या अटीवर सर्वांची जामीनीवर सुटका केल्याची माहिती भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांनी दिली आहे.