ठाणे:पोलीस सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार पीडित नसरीन बानो आणि आरोपी एजाज यांचे निकाहपूर्वी प्रेमसंबंध होते. त्यांच्या दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने ९ एप्रिल २०१० रोजी मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे निकाह झाला होता. निकाह केल्यानंतर दोघे पती- पत्नी म्हणून भिवंडीतील नवी वस्ती भागात राहत असताना त्यांना तीन मुलंही झाली. त्यातच २०१८ मध्ये पीडित पत्नीच्या नणंदचा साखरपुडा असताना आरोपी पतीचे त्याच भागात राहणाऱ्या समीनाशी ओळख होऊन कालातंराने दोघात प्रेमसंबंध निर्माण झाले.
प्रेयसीवरून पत्नीला मारहाण:त्यानंतर पीडित पत्नीला पतीचे सुरू असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाल्याने तिने विरोध केला होता. मात्र त्यावेळी उलट पतीनेच तिला मारहाण करत शिवीगाळ करून गप्प राहण्यास सांगत असे. त्यानंतर मात्र आरोपी पती हा पत्नीशी माफी मागून जुळून घेत होता. त्यातच २०२० मध्ये पीडित पत्नी आणि तिचा पती एजाज हे दोघे माहेरी आई-वडिलांच्या घरी भेटण्याकरिता गेले असता त्यावेळी पीडित पत्नीने तिच्या आई-वडिलांना एजाज याच्या प्रेमसंबंधाबाबत सांगितले. यानंतर आई-वडिलांनी पीडितेला एजाज यांस सोडून देण्याचा सल्ला दिला होता. मात्र या गोष्टीचा आरोपी पतीस राग आल्याने त्याने आई-वडिलांसमोरच पत्नीला मारहाण केली व तिला घरी घेऊन आला. त्यानंतर सुध्दा एजाज याचे त्याची प्रेयसी समीना हिचे मोबाईलवर बोलणे तसेच तिला भेटणे सुरूच होते. त्यामुळे पीडित पत्नीने समिनाच्या प्रेमसंबंधाचा अडथळा आणल्याने आरोपी पतीने पत्नीला बेदम मारहाण केली होती. त्यावेळी ८ जानेवारी २०२१ रोजी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पती विरुद्ध तक्रार दिली होती. त्यानंतर पती-पत्नीत प्रेयसीमुळे सतत वाद होत असल्याने पुन्हा २४ जून २०२२ रोजी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात पीडित पत्नीने तक्रार दाखल केली.
प्रेयसी समोरच पत्नीला तिहरी तलाक: अखेरीस पीडित पत्नीच्या नातेवाईकांनी पुढाकार घेऊन २६ फेब्रुवाारी, २०२३ रोजी रात्री १० वाजल्याच्या सुमारास आरोपी पती त्याची प्रेयसी आणि पीडित पत्नीचे कुटूंब एकत्र येत यातून मार्ग काढून आरोपी पतीला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने त्या दिवशीच पीडित पत्नीच्या कुटुंबासह प्रेयसी समोरच पत्नीला तिहरी तलाक दिला. त्यावेळी 'मैं एजाज अशफाक अन्सारी, नसरीन, मोबीन अन्सारी की लड़की को तलाक देता हूँ, तलाक, तलाक, तलाक' असे तीन वेळा उच्चारून मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरण करून तलाक दिला. दरम्यान पीडित पत्नीचा मानसिक आणि शारीरीक छळ केल्याच्या २ मार्च २०२३ रोजी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४९८, ३२३, ५०४, सह (मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण ) कायद्याचे कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील भांबरे करीत आहेत.
यापूर्वीही तिहेरी तलाकच्या घटना: यापूर्वीही व्हाट्सअपवर पत्नीस ट्रिपल तलाक दिल्याची घटना भिवंडी शहरातील आमपाडा येथे घडली होती. या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पती विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे पतीने ट्रिपल तलाक देताना उर्दू, अरेबिक आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये व्हाट्सअपवर लिहून ट्रिपल तलाक दिला आहे. केंद्र सरकाराने मुस्लिम महिलांच्या सुरक्षेसाठी तिहरी तलाक कायदा लागू केल्यापासून एकट्या भिवंडीत व्हाट्सअपवर पत्नीस ट्रिपल तलाक दिल्याच्या पाच ते सहा घटना घडल्या आहेत. या घटनेत मात्र मोबाईलमध्ये तलाक देताना चित्रीकरण करण्यात आले. यामुळे कायदा लागू करून ही ट्रिपल तलाकच्या घटना थांबत नसल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा:MLA Bachchu Kadu on Stray Dogs : राज्यातील सर्व भटक्या श्वानांना आसाममध्ये पाठवा; आमदार बच्चू कडू यांच्या वक्तव्याने गदारोळ