महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Harassment of Parents Thane : मातापित्यांची छळवणूक; मुलासह सुनेला घरातून बेदखल करण्याचा प्रांताधिकाऱ्यांचे आदेश - माता पित्यांची छळवणूक मुलगा सुनेला शिक्षा

मुलगा व सून सुनेच्या सततच्या जाचाला कंटाळून अखेर नामदेव भेरे यांनी मुलगा वैभव व सून प्रियांका या दोघांविरोधात भिवंडी प्रांत अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. वृद्ध माता-पित्याची छळवणूक करून घर बळकवणाऱ्या मुलासह सुनेला वृद्ध माता पिताच्या घरातून बेदखल करण्यात आले आहे. त्यांना ते घर खाली करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय भिवंडी प्रांताधिकारी यांनी एक सुनावणी प्रकरणी दिला. ( Harassment of Parents Thane )

Harassment of Parents Thane
प्रतिकात्मक फोटो

By

Published : Jan 7, 2022, 7:53 PM IST

ठाणे - वृद्ध माता-पित्याची छळवणूक करून घर बळकवणाऱ्या मुलासह सुनेला वृद्ध माता पिताच्या घरातून बेदखल करण्यात आले आहे. त्यांना ते घर खाली करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय भिवंडी प्रांताधिकारी यांनी एक सुनावणी प्रकरणी दिला. प्रांताधिकाऱ्यांच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाने वृद्ध माता पित्यांना आपल्या मुलाकडून तसेच सुनेकडून होणाऱ्या छळवणूकीस कायमचा आळा बसला आहे.

२०१८मध्ये केले होते मुलाचे लग्न -

शहापूर तालुक्यातील बिरवाडी येथे राहणारे वृद्ध नागरिक नामदेव लडकू भेरे (वय-६०) व त्यांच्या पत्नी सुनिता नामदेव भेरे यांना त्यांचा मुलगा वैभव नामदेव भेरे व सून प्रियांका वैभव भेरे हे दोघेही शारीरिक व मानसिक त्रास देत होते. पीडित नामदेव भेरे हे सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी असून निवृत्तीनंतर ते आपल्या पत्नीसह शहापूर तालुक्यातील बिरवाडी येथील त्यांच्या घरात राहत होते. २०१८मध्ये नामदेव भेरे यांनी त्यांच्या मुलगा वैभव याचे लग्न प्रियांकासोबत मोठ्या थाटामाटात केले होते. मात्र, लग्नानंतर अवघ्या काही महिन्यानंतर मुलगा व सून नामदेव भेरे व त्यांच्या पत्नी सुनिता भेरे या दोघांना शारीरिक व मानसिक त्रास देत होते. तसेच नामदेव भेरे यांचे स्वकष्टाचे घरदेखील बळकाविण्याचा प्रयत्न करत होते.

हेही वाचा -Police Constable Murder : कौटुंबिक वादातून पोलीस कर्मचाऱ्याची हत्या; पत्नी व मुलीला अटक

सततच्या जाचाला कंटाळून तक्रार -

मुलगा व सुनेच्या सततच्या जाचाला कंटाळून अखेर नामदेव भेरे यांनी मुलगा वैभव व सून प्रियांका या दोघांविरोधात भिवंडी प्रांत अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या सुनावणीनंतर भिवंडी प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी माता पिता व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ व आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिक त्यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी नियम २०१० मधील कलम २ ( बी) ( डी) (एफ) कलम ४ (२) (३) व कलम २३ नुसार ज्येष्ठ नागरिकास सर्वसामान्य जीवन जगता यावे यादृष्टीने ज्येष्ठ नागरिक नामदेव लडकू भेरे व त्यांची वृद्ध पत्नी सुनीता भेरे यांच्या घराचा ताबा मुलगा वैभव व सून प्रियांका यांनी तीस दिवसाच्या आत सोडून द्यावा, असे सक्त आदेश दिले आहेत. या आदेशाची प्रत शहापूर पोलीस निरीक्षक तसेच निर्वाह अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग ठाणे यांनादेखील पुढील कार्यवाहीसाठी देण्यात आली आहे.

मुलासह सुनेला लगावली चपराक -

वृद्ध मातापित्यांचा सांभाळ करणे ही मुलांची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे. ज्या वृद्धांना अशाप्रकारे मुलांकडून त्रास होत असेल त्यांनी प्रांत कार्यालयात तक्रार द्यावी. निश्चितच त्यांची मुलांच्या छळवणुकीतून सुटका होऊ शकते, अशी प्रतिक्रिया भिवंडी प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी दिली आहे. त्यांच्या या निर्णयाने वृद्ध माता पित्याची छळवणूक करून घर बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलासह सुनेला प्रांताधिकारी यांनी चांगलीच चपराक लगावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details