ठाणे- देशात सध्या कांद्याच्या किमती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्याने त्यांचा मोठा वांदा झाला आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनता त्रस्त झाली आहे. शिवाय अनेक राज्यांमध्ये कांद्याचे भाव १०० रुपये प्रति किलोपेक्षाही अधिक आहेत. अशामध्येच उल्हासनगरमधील एका दुकानदाराने हँडलूम खरेदीसोबत एक किलो कांदे मोफत देण्याची ऑफर देऊन धमाल उडवून दिली आहे.
देशभरात कांद्याचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. याच पार्श्वभूमीवर उल्हासनगरमधील शीतल हँडलूमच्या दुकान मालकाने एक वेगळी ऑफर देऊ केली आहे. १ हजार रुपयांची हँडलूम खरेदी केल्यावर एक किलो कांदे अगदी मोफत मिळवा, अशी ऑफर या दुकानदाराने दिली आहे. आम्हाला लोकांसाठी काहीतरी करायचे होते. कांद्याचे भाव वाढल्यामुळे आम्ही विचार केला की, हँडलूम खरेदीसोबत कांदे मोफत देऊ, असे दुकानमालक ललित शिवकानी यांनी म्हटले आहे.