महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आदिवासी महिलांचा पाण्याच्या मागणीसाठी हंडा मोर्चा - आंदोलन

या भागातील गाव-पाडे आणि आदिवासी वस्त्यांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे. पाण्यासाठी दाहीदिशा भटकावे लागत असल्याने या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो आदिवासी महिलांनी रिकामा हंडा-मडकी घेवून सोमवारी ठाणे महापलिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीवर धडक दिली.

हंडा मोर्चा

By

Published : Feb 18, 2019, 11:23 PM IST

ठाणे - स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या ठाणे शहरातील घोडबंदर रोड परिसरात नागरीकरण वेगाने वाढत आहे. मात्र, येथे पिण्याच्या पाण्याचे दाहक वास्तव समोर आले आहे. शेकडो आदिवासी महिलांनी रिकामी हंडा-मडकी घेवून सोमवारी ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीवर मोर्चा काढला.

हंडा मोर्चात सहभागी महिला
या भागातील गाव-पाडे आणि आदिवासी वस्त्यांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे. पाण्यासाठी दाहीदिशा भटकावे लागत असल्याने या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो आदिवासी महिलांनी रिकामा हंडा-मडकी घेवून सोमवारी ठाणे महापलिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीवर धडक दिली. तसेच, आपल्या मागण्यांचे निवेदन महापालिका अधिकाऱ्यांना सुपूर्द केले.

ठाणे महापालिकेची निवड स्मार्ट सिटीच्या यादीत झाली आहे. मात्र, महापालिकेच्या स्थापनेपासून ठाण्यात अस्तित्वात असलेले मूळ ठाणेकर नागरिक अद्यापही पाण्यासारख्या मुलभूत सोईपासून वंचित राहत आहेत. ठाण्यातील समतानगर, पातलीपाडा, इंद्रापाडा, डोंगरीपाडा, बोरीवडे, भाईंदरपाडा, वळकरीपाडा, ओवळा-टकरडा, पानखंडा तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या कोकणीपाडा आदी आदिवासी पाड्यांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

या गाव-पाड्यात शेकडो २०० आदिवासी कुटुंबे वास्तव्य करत आहेत. अनेकांची तिसरी-चौथी पिढी येथे राहत आहे. मात्र, येथील कुटुंबाना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे. तसेच, या पाणी टंचाईच्या निषेधार्थ सोमवारी शेकडो आदिवासी महिला डोईवर हंडा-कळशी आणि रिकामी मडकी घेवून माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीवर धडकल्या. यावेळी महिलांनी पालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. मोर्चेकऱ्यांनी पर्यायी पाणी व्यवस्थेसह वैयक्तिक नळजोडणी करून देण्याची आणि शौचालय, स्मशानभूमी, वनहक्क दावे आणि इतर मुलभूत सोईसुविधा पुरवण्याबाबत पालिका अधिकाऱ्याना निवेदन दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details