ठाणे -राज्यात गुटखा विक्रीवर बंदी आहे तरी देखील मोठ्या प्रमाणात गुटख्याची अवैध विक्री होत आहे. लॉकडाऊनच्या काळात भिवंडी परिसरात अन्न आणि औषध प्रशासनाने दोन मोठ्या कारवाया करून करोडो रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला. या प्रकरणी काही आरोपीना अटकही करण्यात आली. मात्र, यातील एका आरोपीला कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आल्याने कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. भिवंडीतील ज्या नारपोली पोलीस ठाण्यात या आरोपीला ठेवण्यात आले होते तेथील अधिकारी, कर्मचारी आणि अन्न व औषध प्रशासनाच्या ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती त्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
तंबाखू, सिगरेट व गुटखा, पान मसाल्याची विक्री करणाऱ्या पानपट्टी व्यावसायिकांवर शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदी लादली. असे असतानाही मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा विक्री होत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीमधील प्रेरणा कॉम्प्लेक्स येथे एका गोदामावर छापा टाकला होता. या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाने तंबाखूजन्य पदार्थांचा ८४ लाख रुपयांचा साठा जप्त केला. तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राहनाळ ग्रामपंचायत परिसरातील मुनीसुरत कॉम्प्लेक्स या ठिकाणी छापा टाकून ३७ लाख ८० हजार रुपयांचा गुटखा आणि १५ लाख रुपयांचा कंटेनर असा एकूण ५२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात केला होता. या दोन्ही प्रकरणी नारपोली पोलिसांनी काही आरोपींना अटक केली होती.