ठाणे - गुडविन ज्वेलर्सच्या कुमार बंधूनी गाशा गुंडाळून पसार झाल्याने हजारो गुंतवणूकदार आर्थिक कोंडीत सापडले आहेत. म्हणून कुमार बंधू हे डोंबिवलीतील नीरव मोदी आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी येथे केला. तपासे यांनी मंगळवारी रामनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेर यांची भेट घेतली. यावेळी तपासे यांनी गुडविन ज्वेलर्सचे मालक सुनील व सुधीश कुमार त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणीही केली. गुंतवणूकदारांनी तपासे यांच्याकडे धाव घेतली असता ते त्यांच्यावतीने पोलीस ठाण्यात आले होते.
हेही वाचा -पीएमसी घोटाळा : आरबीआयच्या इमारतीबाहेर खातेधारकांची 'काळी दिवाळी'
एकीकडे ऐन दिवाळीत राज्यातून गुडविन ज्वेलर्सच्या कुमार बंधूंनी गाशा गुंडाळून पसार झाल्याने हजारो गुंतवणूकदार आर्थिक कोंडीत सापडले आहेत. दुसरीकडे रामनगर पोलीस ठाण्यात गुंतवणूकदारांनी कुमार बंधूनी फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. तपासे पुढे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांच्या बाबत बोलायचे झाल्यास भाजप- शिवसेना हे सरकार स्थापनेत गुंतले आहेत. त्यांना सर्वसामान्याच्या जीवनाशी काहीही घेणेदेणे नाही. आज याठिकाणी भाजप-सेनेच्या मोठ्या नेत्यांनी लक्ष दिले पाहिजे होते. मात्र, गुंतवणूकदारांच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्ष उभा आहे, असेही ते म्हणाले.