ठाणेGram Panchayat Election Result 2023:यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्र्याच्या (शिंदे गट) शिवसेनाला १६, उद्धव ठाकरे गटाला ११, कॉंग्रेस २, शरद पवार गट २, जिजाऊ (निलेश सांबरे) २ आणि ३ अपक्षांनी बाजी मारली आहे. मात्र, अजित पवार गटाचा एकही सरपंच निवडून आला नसल्याने ग्रामीण भागातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपाने प्रथम क्रमांक पटकावल्याने भाजपाच्या गोटात आनंदाचं वातारण पसरलं आहे. (BJP Won in Thane District )
निवडणूक निकालात भाजपाची सरशी:ठाणे जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतींपैकी शहापूरमध्ये एका ग्रामपंचायतीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल झाले नसल्याने १६ सरपंच पदासाठी मतदान पार पडले होते. भिवंडी तालुक्यात १६ ग्रामपंचायत तर मुरबाडमध्ये सर्वाधिक २९ ग्रामपंचायत निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला. यामध्ये भिवंडीतील १६ पैकी ८ भाजप, ४ अपक्ष ,२ कॉंग्रेस, शिंदे गट १, उद्धव ठाकरे गट १ असा निकाल लागला. मात्र, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला भोपळा मिळाला. विशेष म्हणजे, भिवंडी ग्रामीणमध्ये शिंदे गटाचे आमदार शांताराम मोरेंसह उपनेते प्रकाश पाटील यांनी जोरदार प्रचार करूनही एकच ग्रामपंचायतीवर झेंडा फडकावला. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या राजकीय खेळीने पुन्हा एकदा भिवंडी तालुक्यात भाजपाची सरशी झाली आहे.
उद्धव ठाकरे गटाचे यश:शहापूर तालुक्यातील १६ पैकी ९ ग्रामपंचायतीत उद्धव ठाकरे गटाने कब्जा करून शिंदे गटासह अजित पवार गटाला धोबीपछाड दिली. येथे एकाही ग्रामपंचायतीवर ना शिंदे, ना अजित पवार गटाच्या नेत्यांना सरपंच निवडून आणता आला. उलट भाजपा ४, शरद पवार गट २, जिजाऊ गटाने (निलेश सांबरे) २ ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवत आपले राजकीय अस्तित्व दाखवून दिले. विशेष म्हणजे, शहापूरचे आमदार दौलत दरोडा हे अजित पवार गटाचे आहेत. मात्र, तेही आपले राजकीय वर्चस्व राखू शकले नाही. त्यामुळे अजित पवार गटासह शिंदे गटालाही एकाही ग्रामपंचायतमध्ये यश मिळाले नाही. त्याउलट नुकताच शिंदे गट सोडून शरद पवार गटात सामील झालेले माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी दोन ग्रामपंचायतींवर शरद पवार गटाचा झेंडा फडकवला आहे.