ठाणे- लॉकडॉऊनच्या काळात दिल्लीत अडकलेल्या मराठी विद्यार्थ्यांची डॉ. श्रीकांत शिंदे संस्थेच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थेकडून दिल्लीतील यूपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला जात आहे. त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.
दिल्लीत अडकलेल्या सर्व मराठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खरगे आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांशी आपण स्वतः संपर्कात आहोत. या विद्यार्थ्यांना विशेष ट्रेनने किंवा एसटी बसेसच्या माध्यमातून परत आणण्यासाठी शासनस्तरावर लवकरच योग्य निर्णय होईल, असा विश्वासही डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीतील करोलबाग, ओल्ड राजेंद्रनगर भागात यूपीएससी स्पर्धा परीक्षा कोचिंग सेंटर असल्यामुळे या ठिकाणी परीक्षेची तयारी करण्यासाठी देशभरातून हजारो विद्यार्थी येतात. महाराष्ट्रातील जवळपास १५०० च्या आसपास विद्यार्थी सध्या दिल्लीत यूपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. यातील काही विद्यार्थ्यांनी कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधून महाराष्ट्रात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. याला तात्काळ प्रतिसाद देत शनिवारी डॉ. शिंदे यांनी दिल्लीतील निवडक यूपीएससी स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी झूम अॅप्लिकेशनद्वारे संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना धीर दिला आहे.