ठाणे - शहापूर नगरपंचायत हद्दीतील तांबडमाळ येथील आदिवासी पाड्यात जिल्हा परिषदेची शाळा आहे. मात्र, या शाळेत पंचायत समिती शिक्षण विभाग आणि शहापूर नगरपंचायत अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे ८ वर्षांपासून आदिवासी विद्यार्थ्यांना कुडाच्या झोपड्यात बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
शहापूर तालुक्यातील तांबडमाळ येथील आदिवासी मुलांनाही शिक्षणाचा अधिकार मिळावा, यासाठी 2001 साली येथे वसती शाळा सुरू करण्यात आली होती. विशेष म्हणजे ही शाळा त्यावेळी आदिवासी पाड्यातील शिक्षणाचे महत्व जाणणाऱ्यांच्या घरात भरत असे. यानंतर 2008 साली या शाळेला जिल्हा परिषद शाळेचा दर्जा देण्यात आला आणि याठिकाणी दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली.
आता शाळा अस्तिवात असलेली जागा वन विभागाची आहे. यामुळे 2012 सालापासून शाळेच्या (वर्गखोल्या) इमारतीच्या बांधकामासाठी येथील शिक्षकांनी प्रयत्न सुरू केले. मात्र, शहापूर पंचायत समिती शिक्षण विभाग आणि शहापूर नगरपंचायत यांच्याकडून कोणताही प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता वन विभागाकडे न केल्याने शाळेच्या जागेचा प्रश्न प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.