महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

20 वर्षांनी मिळाला चोरी गेलेला ऐवज; रेल्वे पोलिसांनी तक्रारदाराचा पत्ता शोधून केलं परत - लोहमार्ग पोलीस न्यूज

लोहमार्ग पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर यांनी फिर्यादी यांना त्यांचा मुद्देमाल परत करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत लोहमार्ग पोलिसांनी 20 वर्षांपूर्वी चोरीस गेलेला सोन्याचा ऐवज शोधून तक्रारदाराला परत केला आहे. यासह बदललेला पत्ता शोधून अन्य दोघा तक्रारदारांचाही अनुक्रमे 10 व 12 वर्षानंतर ऐवज परत केला आहे.

gold items stolen 20 years before recovered by thane railway police
20 वर्षांनी मिळाला चोरी गेलेला ऐवज; रेल्वे पोलिसांनी तक्रारदाराचा पत्ता शोधून केलं परत

By

Published : Aug 30, 2020, 4:12 PM IST

ठाणे- लोहमार्ग पोलिसांनी वीस वर्षांपूर्वी चोरीस गेलेला सोन्याचा ऐवज शोधून तक्रारदाराला परत केला आहे. यासह बदललेला पत्ता शोधून अन्य दोघा तक्रारदारांचाही अनुक्रमे 10 व 12 वर्षानंतर ऐवज परत केला आहे. सोनसाखळी चोरट्यांचा छडा लावून हस्तगत केलेला ऐवज मूळ मालकांना देण्याबाबत न्यायालयाचे निर्देश आल्यानंतर ऐवज प्रदान करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक स्मिता ढाकणे यांनी दिली. दरम्यान, इतक्या वर्षानंतर आपला चोरीला गेलेला ऐवज परत मिळाल्याने तक्रारदारांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्यांनी लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले.

ठाण्यातील रूनवाल नगर येथे राहणाऱ्या प्रिया तुपे यांची 8 ग्रॅम वजनाची सोनसाखळी 2000 साली ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून चोरीस गेली होती. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर या गुन्हाचा तपास करून पोलिसांनी चोरीस गेलेला ऐवज हस्तगत केला. तसेच तक्रारदार प्रिया यांचा शोध घेऊन व न्यायालयाच्या परवानगीने त्यांचे वडील महेश तुपे यांना सोनसाखळी परत केली. वीस वर्षांपूर्वी चोरी झालेला ऐवज परत मिळाल्याने महेश तुपे यांनी पोलीसांचे आभार मानले.

दुसऱ्या घटनेत, पुण्यातील अमृतसिंह राजवतसिंह गरेवाल यांची दोन तोळे वजनाची सोनसाखळी 2011 साली चोरीस गेली होती. या गुन्ह्याचाही छडा लावला. तक्रारदार यांचा पत्ता बदलल्याने ऐवज परत करणे शक्य होत नव्हते. पोलिसांनी मुंबई, ठाणे, पुणे येथे वर्षभर शोध घेतला. अखेरीस गरेवाल पुण्यात असल्याचे कळल्याने पोलिसांनी दहा वर्षानंतर त्यांचा ऐवज सुखरूप परत केला.

तिसऱ्या घटनेत,ठाण्यातील आझादनगर येथे राहणारे रेल्वे प्रवाशी अमित कार्ले यांच्या 32 ग्रॅम वजनाच्या तीन सोनसाखळ्या 2008 रोजी चोरट्यांनी लंपास केल्या होत्या. या गुन्ह्याचाही यशस्वी तपास करून लोहमार्ग पोलिसांनी तब्बल 12 वर्षानंतर कार्ले यांचा बदललेला पत्ता शोधून ऐवज परत केला.

लोहमार्ग पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर यांनी फिर्यादी यांना त्यांचा मुद्देमाल परत करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत ठाणे लोहमार्ग पोलिसांनी लॉकडाऊन व कोरोनामुळे आपल्या कामकाजात कोणताही खंड पडु न देता, तसेच तक्रारदारांचा पत्ता बदललेला असतानाही सोन्याचा ऐवज परत केल्याने प्रवाशानी आभार व्यक्त केले.

हेही वाचा -मासे पकडणे बेतले जीवावर..! सख्ख्ये भाऊ नदी पात्रात बुडाले, एकाचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details