नवी मुंबई - एका तरुणीला धावत्या लोकलमधुन वाशी खाडी पुलावर ढकलून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही तरुणी मंगळवारी सकाळी वाशी खाडी पुलावर रेल्वे रुळाजवळ जखमी अवस्थेत आढळली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. प्राथमिक तपासात सदर तरुणीवर बलात्कार झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार वाशी रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न व बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
जखमी अवस्थेत आढळली तरुणी
पिडीत तरुणी टिटवाळा इथे राहात असून ती पवईत घरकाम करते. गेल्या शनिवारी ती टिटवाळयाला आईवडिलांना भेटायला गेली होती. टिटवाळ्याहून परतल्यानंतर मात्र तिचा कुटुंबियांशी संपर्क झाला नाही. मंगळवारी पहाटे सहाच्या सुमारास ही तरुणी वाशी खाडी पुलावर अप रेल्वे मार्गाच्या रुळालगत जखमी अवस्थेत मोटारमनला दिसली. मोटरमनने याबाबत स्टेशनमास्तरला माहिती दिली. त्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांना कळवले. पोलिसांनी आणि आरपीएफच्या जवानाने घटनास्थळी येऊन जखमी तरुणीला तत्काळ वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले.