ठाणे: जिग्नेश मोरेश्वर जाधव असे फरार झालेल्या आरोपी मित्राचे नाव आहे. तर काजल इस्माईल शेख असे गंभीर जखमी झालेल्या मैत्रिणीचे नाव असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी काजल ही डोंबिवली पूर्व भागात राहते. तर आरोपी मित्र जिग्नेश हा डोंबिवली पूर्वेकडील देसलेपाडा भागात राहतो. दोघांमध्ये मैत्री होती; मात्र मैत्रीच्या आडून आरोपी जिग्नेश हा काजलवर एकतर्फी प्रेम करीत होता. त्यातच १४ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास काजल ही एकटीच घरी पायी जात होती. यावेळी जिग्नेशने तिला रस्त्यात थांबवून 'तू मला खूप आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करेन, तू माझ्या बरोबर ये,' असे बोलले; परंतु, काजलने त्याला नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या जिग्नेशने तिच्यावर हल्ला चढवत गंभीर जखमी केले आणि घटनास्थळावरून पळ काढला.
काजलला रुग्णालयात केले दाखल: घटनेची माहिती मिळताच टिळकनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करत गंभीर जखमी अवस्थेत काजलला डोंबिवलीतील रुग्णालयात दाखल केले; मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी ठाण्यातील कळवा तेथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांकडून तपास सुरू:सध्या जखमी काजलवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. घटना १४ एप्रिल रोजी घडली असून आरोपी मात्र अद्यापही फरार आहे. त्यामुळे अधिक माहिती देण्यास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण बाकले करीत आहेत.