ठाणे -भिवंडी - ठाणे महामार्गावरील हायवे-दिवे गावातून अपहरण झालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात अपहरणासह हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
नेहा विश्वकर्मा (१७) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. भिवंडी तालुक्यातील हायवेदिवे येथे एका चाळीत मृतक नेहा कुटुंबियांसह वास्तव्यास होती. ती ५ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास आपल्या आईसोबत उघड्यावर शौचास गेली होती. मात्र, तिची आई घरी परतली असता बराच वेळ झाला तरी ती घरी परतली नाही. त्यामुळे तिचा परिसरात शोध घेतला. मात्र, ती आढळून आली नाही. त्यामुळे तिचे वडील राजेंद्र विश्वकर्मा यांनी नारपोली पोलिस ठाण्यात तिच्या अपहरणाची तक्रार दाखल केली.