ठाणे- बुधवारी गटारी अमावस्येच्या निमित्ताने नागरिकांनी मांसाहार व मद्यपान करून हा दिवस साजरा केला. तर दुसरीकडे मात्र विद्यार्थी भारती या संघटनेतर्फे स्मशानभूमीत 'भूता भूता ये ये' असे आवाहन करीत 'एक रात्र भुताची' हा आगळावेगळा कार्यक्रम मध्यरात्रीच्या सुमारास स्मशानभूमीत साजरा करण्यात आला. तरुणांमध्ये भुताखेतांची भीती घालवावी. तसेच, मनात भोंदूगिरी ठासून भरलेल्या अंधश्रद्धा दूर व्हाव्यात, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
भिवंडी तालुक्यातील नांदकर-बापगाव येथील स्मशानभूमीत हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी स्मशानभूमी भूत-प्रेत, बुवाबाजी, बाबागिरी कशी समाजात पसरवली जाते याचे पथनाट्यातून सादरीकरण करण्यात आले. तसेच प्रबोधनात्मक गीते सादर करून भुतांना आव्हान करीत गटारीचा आनंद साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात असंख्य महाविद्यालयीन युवक-युवती, पालकवर्ग सहभागी झाले होते.