ठाणे - भिवंडी लोकसभेच्या मतदारसंघासाठी भाजप-शिवसेना-रिपाइं कार्यकर्त्यांचा मेळावा कल्याण पश्चिममध्ये आयोजित केला होता. या मेळाव्यात पत्रकारांनी पालकमंत्री एकनाथ शिंदेंना बाळूमामा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे का? असा प्रश्न विचारताच पालकमंत्र्यांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न विचारून घूमजाव केल्याचे दिसून आले आहे.
भिवंडी लोकसभेत शिवसेनेकडून बंडाचा झेंडा फडकवणाऱ्या ठाणे ग्रामीणचे संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षापासून बाळामामा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे, मात्र भाजपने पुन्हा कपिल पाटील यांना युतीचे उमेदवार घोषित केले आहे. त्यामुळे गेल्या महिन्यापासून बाळामामा काँग्रेसकडून तिकिट मिळवण्यासाठी दिल्ली वारी करत आहेत. माजी खासदार सुरेश टावरे यांना काँग्रेसचे उमेदवार घोषित केल्याने आता बाळा मामा अपक्ष लढवण्याच्या मनस्थितीत आहेत. याच प्रश्नावर पत्रकाराने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता एकदा युतीने कपिल पाटील यांची घोषित केल्यावर त्यांचा प्रश्नच येत नाही तुम्हाला बाळामामाने सांगितले का? असा उलट प्रश्न विचारत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देणे टाळले, यामुळे आजही भाजप-शिवसेना दुरावा कायम असल्याचे दिसून आले आहे.