महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Gangwar : गँगवॉर! स्वतःच्याच टोळीतील गुंडावर पिस्तूलमधून झाडली गोळी; दोन गुंडांना अटक - Shot from pistol at goon in his own gang

दोन प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांच्या गोळीबारात एका गुंडाने स्वत:च्याच टोळीतील गुंडावर गोळीबार केला. यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला. ही घटना ठाणे जिल्ह्यातील बदलापूर-अंबरनाथ मार्गावरील ढाब्या समोर घडली आहे.

Thane Gangwar
दोन गुंडांना अटक

By

Published : Jul 16, 2023, 9:26 PM IST

गुंडावर झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याची प्रतिक्रिया

ठाणे: कल्याणातील एका गुंडावर प्रतिस्पर्धी टोळी कडून काही दिवसांपूर्वी गोळीबार करून गंभीर जखमी करण्यात आले होते. त्याचा बदला घेण्याच्या शोधात आलेल्या भावासह दोन साथीदारांनी प्रतिस्पर्धी टोळीतील एकाला रस्त्यात गाठले आणि पिस्तूल दाखवत धमकी दिली. माझ्या भावावर गोळीबार करणारा कुठे आहे, असे बोलताच बाचाबाची होऊन गोळीबार करण्यात आला. मात्र, गोळीबारात स्वतःच्याच टोळीतील गुंडाला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.


गोळीबार प्रकरणी दोघांना अटक:ही घटना बदलापूर-अंबरनाथ मार्गावरील ढाब्या समोर घडली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार तीन गुंडांवर गुन्हा दाखल करून गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक केली. तर गोळीबारात जखमी झालेल्या गुंडावर उपचार सुरू असल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे. चंदन जुबराज भदोरिया (रा. कल्याण पश्चिम) आणि रोहितसिंग पुरणसिंग पुना (रा. उल्हासनगर) असे अटक केलेल्या गुंडांची नावे आहेत. तर आलोक रामानंद यादव (रा. अंबरनाथ) असे गोळीबारात गंभीर जखमी असलेल्या गुंडाचे नाव आहे.

असा घडला घटनाक्रम:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक गुंड चंदन याच्या भावावर काही दिवसांपूर्वी प्रतिस्पर्धी टोळीतील विवेक नायडू या गुंडाने गोळीबार केला होता. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच गोळीबाराचा बदला घेण्यासाठी गुंड चंदनने आपल्या दोन साथीदारांसह नायडूचा शोध घेऊन त्याच्यावरही गोळीबार करण्याचा कट रचला होता. त्यातच गुंड चंदन हा त्याचे साथीदार रोहितसिंग आणि आलोक हे तिघे १५ जुलै रोजी दुपारी बदलापूरच्या बारबी डॅमवरून पार्टी करून आपल्या दुचाकीने कल्याणच्या दिशेने येत होते. त्याच सुमारास बदलापूर-अंबरनाथ मार्गावरील ढाब्या समोर गुंड नायडूचा एक मित्र दिसला. त्याला दुपारी दीड वाजल्याच्या सुमारास रस्त्यात गाठून त्याच्याकडे नायडू कुठे आहे, अशी विचारणा केली. यानंतर गुंड चंदनने पिस्तूल काढून त्याला धमकी दिल्याने बाचाबाची झाली. यानंतर चंदनच्या पिस्तूलमधून गोळी सुटून ती त्याचाच साथीदार आलोकच्या मांडीत घुसली. तर नायडूंचा मित्र घटनास्थळावरून पळून गेल्याने तो बचावला आहे.

गोळीबारातील दोन्ही गुंडांना अटक:घटनेनंतर गुंड आलोक याला चंदन आणि रोहितसिंग या गुंडानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दुसरीकडे गोळीबाराची खबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांना मिळताच त्यांनी दोन्ही गुंडाचा शोध घेऊन त्यांना काही तासातच अटक केली. या गुन्ह्यात जखमी गुंड आलोकही आरोपी असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू असल्याने त्याला अटक केली नसल्याचे सांगण्यात आले. तर अटक गुंडाकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूससह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. अटकेतील आणि जखमी असे तिन्ही गुंड पोलीस रेकॉडवरील दाखलेबाज गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात समोर आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे.

हेही वाचा:

  1. Pune Crime: पोलिसांच्या ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 577 गुन्हेगारांना अटक
  2. Easy Pay Company: इझी पे कंपनीला एजंटांनीच घातला साडेतीन कोटींचा गंडा; पुणे सायबर पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश
  3. Rohit Pawar Office Fire Case : रोहित पवार यांच्या हडपसर येथील कार्यालयात अज्ञात आरोपीने सायकलला लावली आग

ABOUT THE AUTHOR

...view details